

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिंडोरी तालुक्यातील जांबूटके ग्रामपंचायतींचे ग्रामपंचायत अधिकारी रवींद्र निवृत्ती चौधरी यांचा 'एकट्याने नाही... साखळीने खाल्ले, मी एकट्याने पैसे खाल्ले नाहीत, या पैशांचा वाटा वरपर्यंत जातो', असे वक्तव्य करणारा व्हिडिओ व्हायरल झाला. प्रशासनाचे वाभाडे काढणाऱ्या या व्हिडिओंची मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी गंभीर दखल घेत गुरुवारी (दि. १६) तत्काळ चौधरी यांना निलंबीत केले आहे.
जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामपंचायत विभागामार्फत शासकीय सेवेत शिस्त, पारदर्शकता व प्रामाणिकपणा अबाधित ठेवण्यासाठी घेतलेल्या कठोर भूमिकेचे स्वागत केले जात आहे. गुरुवारी दिवसभर सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये चौधरी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची प्रतिमा मलीन झाल्याचे f निदर्शनास आले.
संबंधित व्हिडिओमध्ये आर्थिक व्यवहारांबाबत केलेले वक्तव्य, तसेच विविध स्तरांवरील अधिकाऱ्यांवर विनापुरावा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्यामुळे प्रशासनाच्या सचोटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकारामुळे जनतेमध्ये चुकीचा संदेश जाऊन प्रशासनावरील विश्वास कमी होण्याची शक्यता निर्माण झाल्याने प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करत दणका दिला. जिल्हा परिषद सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्याला आपले कर्तव्य पार पाडताना प्रामाणिकपणा, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव ठेवणे अपेक्षित असते.
कोणत्याही प्रकारे लाचखोरीचे समर्थन करणे अथवा बिनबुडाचे आरोप करणे हे सेवाभावाशी विसंगत असून, अशोभनीय वर्तन मानले जाते. या पार्श्वभूमीवर चौधरी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले.
त्या अनुषंगाने, महाराष्ट्र जिल्हा परिषद, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ मधील नियम ३ (१) (अ) अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अधिकाराचा वापर करून चौधरी यांना तत्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित केले आहे. निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय पंचायत समिती, येवला येथे निश्चित केले असून, तेथे त्यांना नियमानुसार उपस्थित राहणे बंधनकारक राहील.