

नाशिक : जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी बुधवारी (दि.६) यांनी पदभार स्वीकारात कामकाजाला सुरुवात केली. जिल्ह्यातील ग्रामीण विकास, शिक्षण, आरोग्य व केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल, लोकाभिमुख प्रशासन म्हणून पुढील काळात जिल्हा परिषदेच्या वतीने काम करण्यात येणार आहे तसेच ग्रामीण भागात विशेषत: आदिवासी भागातील ५० उत्कृष्ठ खेळाडू घडविण्याचे ध्येय असल्याचे पवार यांनी सांगितले.
बुधवारी (दि.6) सकाळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी त्यांनी विभागप्रमुखांची बैठक घेत आढावा घेतला. प्राथमिक शिक्षण, आरोग्य विभागासह महिला व बालकल्याण विभागातील योजनांकडे विशेष लक्ष राहिल. कुपोषणाच्या बाबतीत 'ग्राऊंड रिपोर्ट' घेऊन योग्य त्या उपयायोजना सूचविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे उपविभागीय अधिकारी असताना ओमकार पवार यांनी या दोन तालुक्यांतील खेळाडूंसाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी मिळाल्याने हा उपक्रम जिल्हाभर राबविण्यात येईल. त्यासाठी विविध संस्थांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी (सीएसआर) वापरण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. दिवसभर विविध विभागातील कर्मचारी व कर्मचारी संघटनांनी पवार यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले.
कार्यालयात बसून काम करण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर जाण्यावर भर राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले. कोणत्याही अधिकाऱ्यांना किंवा कर्मचाऱ्यांना आपल्या दौऱ्याविषयी माहिती न देता 'अचानक भेटी' करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.