

Omkar Pawar has been appointed as the Chief Executive Officer of the Zilla Parishad.
नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे प्रांताधिकारी ओमकार पवार यांची नियुक्ती झाली आहे. मंगळवारी (दि. 5) याबाबतचे आदेश निर्गमित झाले. बुधवारी (दि. ६) सकाळी १० वाजता ते मुख्यकार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार स्विकारणार आहेत. दरम्यान, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'धक्कातंत्राचा' वापर केला आहे.
गत आठवठ्यात नाशिक जिल्हा परिषद च्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते. या जागेसाठी अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होती. यासाठी धुळे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, ठाणे जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह अमरावतीच्या सीईओ संगिता महापात्रा यांच्या नावाची चर्चा होती. मात्र, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्यकार्यकारी अधिकारी पद महत्वाचे असल्याने येथील अधिकाऱ्यांची नियुक्ती स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष घातले होते. त्यासाठी चार दिवसांपासून शोध सुरू होता. यात, पवार यांच्यावर मुख्यकार्यकारी अधिकारी पदाची धुरा सोपविण्यात आली आहे.
सातारा जिल्ह्यातील सनपाने येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेले पवार हे २०२२ मधील सनदी अधिकारी आहेत. नागरी सेवा परीक्षेत त्यांनी १९४ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले. १२ जून २०२३ ते जून २०२४ पर्यत गडचिरोली येथे परिविक्षाधीन कालावधी (प्रोबेशन) पूर्ण केला. त्यानंतर ९ सप्टेंबर २०२४ पासून त्यांची इगतपुरी- त्र्यंबकेश्वर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. वर्षभराच्या कालावधीत त्यांनी विधानसभा निवडणूक व मे मध्ये गोंदे एमआयडीसीतील 'जिंदाल' कंपनीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका निभावली होती. आडवण येथील प्रस्तावित उद्योगासाठी भूसंपादन अंतर्गत जमिन मोजणीची प्रक्रिया मार्गी लावण्यात त्यांना यश मिळाले. तसेच आदिवासींच्या योजना राबविण्यास त्यांनी प्राधान्य दिले. विशेषत: शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना २४ तासांच्या आत शैक्षणिक दाखला देण्यात त्यांचे मोठे योगदान राहिले. तीन महिन्यांत तब्बल साडेसहा हजारांवर दाखले वितरीत केले. तसेच चुकीच्या पध्दतीने काम करणाऱ्या आपले सेवा केंद्र चालकांवर त्यांनी कारवाई देखील केली.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त झालेले पवार हे सानपाने (ता. जावळी जि. सातारा) गावच्या जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी राहिलेले आहेत. प्राथमिक शिक्षण त्यांनी या शाळेत घेतले. त्यांची जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्या मुळगावी ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला आहे.
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आहे. जिल्हा परिषदेचे कामकाज समजून कामाला सुरूवात करणार आहे. जिल्ह्याची सर्वांगिण माहिती घेऊन उत्तम पध्दतीने काम करण्याचा प्रयत्न राहील.
ओमकार पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद, नाशिक)