

नाशिक : जिल्हा परिषदेत महिलांशी गैरवर्तन करण्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर महिलांना संरक्षण द्यावे. राज्यभर नावलौकिक असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेची बदनामी होता कामा नये, अशा सूचना शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना दिल्या. तसेच आरोग्य व महिला बालकल्याण विभागाअंतर्गत मोठ्या तक्रारी आहेत. या तक्रारींचा तत्काळ निपटरा करावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
जिल्हा परिषदेतील महिलांचे गैरवर्तन व लैंगिक छळ प्रकरण राज्यभर गाजत असून, विधान परिषदेतही हा मुद्दा उपस्थितीत झाला. यात दोन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. 14) आ. दराडे यांनी मित्तल यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी महिलांना त्रास देण्याबाबत आणखी काही तक्रारी आहे का, याबाबत विचारणा दराडे यांनी केली. त्यावर मित्तल यांनी तक्रारी नसल्याचे सांगितले.
या प्रकारामुळे महिला कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण आहे ते दूर झाले पाहिजे. या प्रकरणाने राज्यात जिल्हा परिषदेची बदनामी झाली आहे. परंतु आता असे प्रकार होता कामा नये, चार भिंतीत तक्रारी सोडवा, असे दराडे यांनी यावेळी सांगितले. पोषण आहार वितरण प्रणालीत मोठ्या तक्रारी आहेत, वेळात पोषण आहार मिळत नाही. त्यामुळे बालके आहारापासून वंचित आहेत. याबाबत दखल घेऊन मुलांना आहार कसा मिळेल याबाबत यंत्रणेला सूचना करण्याचे निर्देश दराडे यांनी दिले.
आरोग्य विभागाअंतर्गत अधिकारी वर्गाकडून आरोग्यसेवक, सेविका यांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी आहेत. याबाबत अनेक कर्मचाऱ्यांनी माझ्याकडे तक्रारी केल्याचे दराडे यांनी सांगितले. या दोन्ही विभागाअंतर्गत असलेल्या तक्रारी सोडवा, अशा सूचना दराडे यांनी बैठकीत केल्या. जिल्हा परिषदेचे शासन दरबारी काही प्रलंबित प्रश्न असतील तर द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तक्रारी सोडविण्यात येतील, असे मित्तल यांनी यावेळी आ. दराडे यांना अश्वासित केले.