

Nashik Zilla Parishad teachers eligible transfer
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेला आता वेग आला आहे. विभागाने बदली पोर्टलवर पात्र शिक्षकांची यादी जाहीर केली आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या ९ हजार ८८९ शिक्षकांपैकी ३ हजार ९५० शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. त्यानुसार बदलीपात्र, बदली अधिकार प्राप्त आणि अवघड क्षेत्रातील रिक्त होणाऱ्या जागांची माहिती जाहीर करण्यात आली आहे. संबंधित तालुक्यातील शिक्षकांना गटशिक्षणाधिका-यांमार्फत ही यादी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या एकूण शिक्षकांपैकी सुमारे निम्मे शिक्षक यंदा बदलीस पात्र ठरणार आहेत.
जि. प. शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलवर राबविण्यात येत आहे. शासनाने बदल्यांसाठीचे धोरण १८ जून २०२४ रोजी जाहीर केले आहे. जि.प. च्या ३ हजार २६३ प्राथमिक शाळा आहेत. त्यांची अवघड व सोपे क्षेत्र अशी विभागणी करण्यात आली आहे. अवघड क्षेत्रातील शाळेत तीन वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांना बदली मागण्याचा अधिकार आहे. तसेच सोप्या क्षेत्रातील शाळेत सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी पूर्ण झालेल्या शिक्षकांना बदलीस पात्र ठरवले जाते.
या शिक्षकांनी स्वतः बदलीची मागणी केल्यास त्यांना बदलीचा अधिकार प्राप्त होतो. जिल्ह्यात बदलीस पात्र शिक्षकांच्या याद्या जाहीर झाल्या असून, हजारो शिक्षक बदलीस पात्र ठरले आहेत. मात्र, जागा किती रिक्त होतात यावरच सर्व काही अवलंबून असल्याचे शिक्षक संघटनांनी सांगितले. शिक्षकांची बदली प्रक्रिया सध्या चांगलीच चर्चेत असून, सोशल मीडियावरही बदलीविषयी चर्चा रंगू लागल्या आहेत.
बदलीस पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्ध झाल्याने आता रिक्त जागा भरण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात येईल. येत्या काही दिवसांत हे पोर्टल सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर संवर्ग एकची बदली प्रक्रिया सुरू होईल.
एखाद्या शिक्षकाने खोटी वा दिशाभूल करणारी माहिती भरून बदली करून घेतल्याचे आढळून आल्यास, त्या शिक्षकावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातील सूचना शिक्षण विभागाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे बदली प्रक्रियेत कोणीही खोटी अथवा दिशाभूल करणारी माहिती भरून बदलीचा लाभ घेऊ नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.