

Nashik News Leopard Trapped In Cage
सिडको : पिंपळगाव खांबजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या शेतात वावर असणारा बिबट्या अखेर वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात पाच दिवसांनंतर जेरबंद झाला. बिबटया जेरबंद झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
पिंपळगाव खांब येथे पुन्हा एकदा बिबट्याचा खुलेआम वावर असल्याचे निदर्शनास आल्याने या भागातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतीमधील कामे करण्यासही अडचणी येत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या शेतावरील कुशल हरळ या मजुरावर ३१ मे रोजी दुपारच्या वेळी बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मजुराने प्रसंगावधान राखत तात्काळ घराकडे धाव घेतल्याने बिबट्या मकाच्या शेतात पळून गेला.
पिंपळगाव खांब येथे काही दिवसांपूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात एक शेळी ठार झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एका बंगल्याच्या आवारात चार बिबट्यांचा वावर असल्याचे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले होते. त्यानंतर वनविभागाने या भागात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावला होता. गेल्या दोन महिन्यात या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला नाही. त्यातच शनिवारी ३१ मे रोजी दुपारी पुन्हा एकदा बिबट्याचा खुला वावर स्थानिक शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला.
पिंपळगाव खांबजवळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांचे शेती फॉर्म हाऊस आहे. शनिवारी दुपारी त्यांचे बंधू विठोबा चुंभळे आणि नातू संस्कार चुंभळे शेतावर होते. यावेळी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मजूर कुशल हरळ हा शेतात खत टाकण्यासाठी जात असताना शेतात झोपलेला बिबट्या जागा झाला. त्याने हरळ याच्यावर झडप घेतली. यावेळी हरळ याने प्रसंगावधान राखत घराकडे धाव घेतली. तर बिबटया मकाच्या शेतात पळून गेला.
या घटनेची माहिती शिवाजी चुंभळे यांनी माहिती दिल्यानंतर पोलिस व वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. वनविभागाने शनिवारी शेतात पिंजरा लावला होता. गुरुवारी सकाळी विठोबा चुंभळे पिंजऱ्याकडे गेले असता बिबट्या जेरबंद झाल्याचे दिसून आले. यानंतर वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.