

Nashik Shinde faction also opposes Badgujar's entry
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला नाशिक पश्चिम मतदारसंघातील भाजप आमदार सीमा हिरे यांनी कडाडून विरोध दर्शविल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनीदेखील बडगुजर यांना पक्षात घेण्यास हरकत घेतली आहे.
तिदमे यांनी या संदर्भात दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे की, बडगुजर यांच्यावर मुंबई बॉम्बस्फोटातील दहशतवादी सलीम कुत्ता याच्याशी संबंध असल्याचे आरोप आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर त्यांनी बडगुजर यांना शिवसेनेत ठेवलेच नसते. त्यामुळे त्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास सर्व शिवसैनिकांचा विरोधच राहील.
बडगुजर यांनी महायुती विरोधात गरळ ओकली होती. कुंभमेळा लक्षात घेऊन ठेकेदारीसाठीच त्यांना सत्तेत सहभाग हवा असल्याचे आरोप झाले आहेत. शिवसेनेत जनसामान्यांना सोबत घेऊन वाटचाल करणे कै. बाळासाहेबांना आणि धर्मवीर आनंद दिखेंना अपेक्षित होते. त्यांच्या शिकवणीतून शिवसेनेचा झेंडा घेऊन सामाजिक कार्यात उतरणाऱ्यांना शिवसेनेची दारे नेहमीच उघडी आहेत. मात्र, बाळासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा करणाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास शिवसैनिकांचा विरोधच राहील, असे तिदमे यांनी म्हटले आहे.