

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अधिकाऱ्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, मुख्य कार्यकारी अधिकारी पदाला महत्त्व प्राप्त झाले असून, येथील अधिकाऱ्याची नियुक्ती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करणार असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, या पदासाठी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्यासह अमरावतीच्या सीईओ संगीता महापात्रा यांच्या नावाची चर्चा असून, या तिघांमध्ये स्पर्धा लागली आहे. या तिघांही अधिकाऱ्यांकडून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली आहे. या तिघांपैकी कोणाची नियुक्ती होते की, मुख्यमंत्री फडणवीसांकडून 'धक्कातंत्राचा' वापर होतो, हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे. शुक्रवारी (दि. 1) किंवा शनिवारी (दि. 2) त्यांची नियुक्ती आदेश निघण्याची शक्यता आहे.
मित्तल यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने गुरुवारी सायंकाळी निरोप देण्यात आला. त्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गत तीन वर्षांतील कार्यकाळात जिल्ह्यात चांगले काम करण्याची संधी मिळाली. हे काम करताना खूप काही शिकायला मिळाले. विविध उपक्रम राबविण्यात यश आले. या अनुभवाचा फायदा भविष्यात निश्चितपणे होईल, असा विश्वास मित्तल यांनी यावेळी व्यक्त केला.
मित्तल यांची बदली झाल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी या संदर्भात गुरुवारी (दि. ३१) या संदर्भातील आदेश दिले.