

Zilla Parishad CEO Ashima Mittal transferred
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारीपदी पदोन्नतीने बदली झाली आहे. मित्तल यांच्या जागी अद्याप कोणाचेही नियुक्तीचे आदेश प्राप्त झालेले नाही. नाशिकला त्यांनी दोन वर्षे दहा महिने प्रशासक म्हणून जबाबदारी सांभाळली.
जिल्हा परिषदेच्या तत्कालीन कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची २८ सप्टेंबर २०२३ रोजी बदली झाली, त्यावेळी पालघर येथे प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या आशिमा मित्तल यांची नाशिकला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
३० सप्टेंबर २०२३ रोजी त्यांनी जिल्हा परिषदेचा कारभार हाती घेतला. यानंतर जिल्ह्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी 'सुपर ५०' हा उपक्रम तीन वर्षे यशस्वीरीत्या राबविला नावीन्यपूर्ण उपक्रमातून सुरू झालेला हा उपक्रम राज्यभर पसरला. तसेच जिल्ह्यातील कुपोषण कमी करण्यासाठी 'बेस्ट फीडिंग' उपक्रम राबविला.
तसेच नवीन प्रशासकीय इमारतीचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेला केंद्र व राज्य शासनाचा पुरस्कारदेखील प्राप्त झाला. राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या उपक्रमात जिल्हा परिषदेचा गौरव झाला. विशाखा समितीकडे प्राप्त झालेल्या तक्रारींवरून तीन विभाग प्रमुखांवर कारवाईचा बडगा उगारण्याची वेळ त्यांच्यावर आली.