

मालेगाव : सादिक शेख
उन्हाची तीव्रता वाढत असताना नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. मार्च अखेरपासून सुरू झालेली पाणीटंचाई एप्रिलच्या मध्यापर्यंत अधिक तीव्र झाली असून, जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ४६ गावे व १०३ वाड्यांना सध्या ५२ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
या टँकरद्वारे दररोज ९५ फेऱ्या मारून पाणीपुरवठा सुरू आहे. यंदा उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने पाण्याचे स्रोतदेखील आटले आहेत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच जिल्ह्यातील आदिवासी तालुक्यांसह मालेगाव, देवळा, इगतपुरी, येवला आणि सित्ररच्या काही गावांना पाण्याची टंचाई भासत होती.
येवला, इगतपुरी, मालेगाव, देवळा, सिन्नर व पेठ तालुक्यांतून सर्वात आधी टँकर मागणी झाली होती. चांगला पाऊस पडूनही येवला तालुक्याला मागील वर्षीप्रमाणेच टँकरची गरज आताच भासू लागली आहे. या उलट नांदगाव, बागलाण, दिंडोरी, नाशिक, सुरगाणा, त्र्यंबक, कळवण, निफाड या तालुक्यांतून अद्याप एकाही टँकरची मागणी झालेली नाही.
मागील वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील धरणांची स्थिती अजूनही चांगली आहे. जिल्ह्यातील धरणांमध्ये मार्च अखेर एकूण जलसाठा ४८.९४ टक्के इतका असल्याने धरणे समाधानकारक असली तरी गावखेड्यातील पाण्याचे स्रोत आटल्याने टँकरची आवश्यकता भासू लागली.
विशेषतः आदिवासी तालुक्यातून अगोदर मागणी झाली. मालेगाव, येवला आणि इगतपुरी तालुक्यांत असलेल्या वाड्यापाड्यांवर पाणी मिळत नसल्याने तेथून टँकरची मागणी होऊ लागली. त्यानुसार सध्यातरी या तीनही तालुक्यांत आदिवासी तालुक्यांपेक्षा अधिक टँकर सुरू आहेत.
भविष्यात आणखी वाड्या-पाड्यांवर टँकरची वाढ होण्याचीही शक्यता आहे. तहसील पातळीवरून आलेले प्रस्ताव जिल्हा पातळीवर पाठविले जातात. तेथून मंजुरी मिळाल्यानंतर स्थानिक पातळीवर टँकर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू होते. मागील महिन्यात आणि एप्रिलच्या सुरुवातीला प्राप्त झालेल्या टँकर मागणीनुसार प्रस्ताव मंजूर झालेले आहेत. आणखी काही प्रस्ताव तहसील पातळीवर प्राप्त होत असल्याने टँकर मागणीत वाढ होण्याची शक्यता दिसत आहे.
१९ विहिरी अधिग्रहित; ५२ खासगी टँकरची मदत
जिल्ह्यात सध्या ५२ खासगी टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची आवश्यकता भागविण्यासाठी प्रशासनाने मालेगाव तालुक्यात नऊ, चांदवड, पेठ प्रत्येकी दोन, इगतपुरी व सिन्नर प्रत्येकी एक, येवला चार याप्रमाणे १९ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या तालुक्यात ५२ टँकरच्या माध्यमातून ९५ फेऱ्या केल्या जात आहेत.
१९ विहिरी अधिग्रहित; ५२ खासगी टँकरची मदत जिल्ह्यात सध्या ५२ खासगी टँकरच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याची आवश्यकता भागविण्यासाठी प्रशासनाने मालेगाव तालुक्यात नऊ, चांदवड, पेठ प्रत्येकी दोन, इगतपुरी व सिन्नर प्रत्येकी एक, येवला चार याप्रमाणे १९ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या तालुक्यात ५२ टँकरच्या माध्यमातून ९५ फेऱ्या केल्या जात आहेत.