नाशिक : नाशिक दत्तकची घोषणा केली अन् माझे सरकार गेले. मुलगा कडेवरच राहिला, पण सरकार नसल्याने नाशिकचा अपेक्षित असा विकास करता आला नसल्याची खंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. मात्र, २०१८ मध्ये दिलेले आश्वासन, आता पुढील पाच वर्षांत पूर्ण करणार असल्याचा शब्द पुन्हा एकदा त्यांनी नाशिककरांना दिला.
एका मुलाखतीदरम्यान विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘२०१८ मध्ये नाशिक दत्तक योजनेची घोषणा केली होती, मात्र सरकार बदलल्यामुळे विकासाच्या संधी कमी आल्या. नाशिकमध्ये मोठी क्षमता असून येथील स्त्रोत, वातावरण आणि लोकांची सकारात्मक वृत्ती आहे. मात्र, अपेक्षित प्रगती साध्य झाली नाही. मोठ्या शहरांच्या जवळ राहणे कधी कधी धोकादायक ठरते. जसे मुंबईच्या समीप असल्याने पुणे आणि छत्रपती संभाजीनगरचा विकास वेगाने झाला, मात्र नाशिकला तसा लाभ मिळाला नाही. यामागे दोन प्रमुख कारणे आहेत, त्यातील एक म्हणजे अखंड आणि प्रभावी कनेक्टिव्हिटीचा अभाव. जसा मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे तयार झाल्याने पुणे-मुंबई प्रवास दीड तासांवर आला आणि पुण्याचा झपाट्याने विकास झाला, तसेच नाशिक-मुंबई प्रवास दोन-अडीच तासांवर आल्यास नाशिकच्या विकासाला मोठी चालना मिळेल.’
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, नाशिक-मुंबई कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी समृद्धी महामार्ग अत्यंत फायदेशीर ठरेल. समृद्धी हायवेवर मल्टिमॉडेल कॉरिडॉर विकसित करून थेट जेएनपीटी पोर्टशी जोडण्यात येणार आहे. यामुळे नाशिक ते जेएनपीटी दरम्यानचा प्रवास तीन ते साडेतीन तासांत पूर्ण होईल. याशिवाय, देशातील सर्वात मोठे पोर्ट वाढवण येथे उभारण्यात येत असून, हे जेएनपीटीपेक्षा तीनपट मोठे असेल. नाशिकपासून वाढवण पोर्टचे अंतर केवळ १०० किलोमीटर आहे. त्यामुळे समृद्धी महामार्गावरून नाशिकला थेट ग्रीनफिल्ड रोडद्वारे वाढवणशी जोडले जाणार आहे. यामुळे वाढवण पोर्टशी संबंधित विकास नाशिकसाठी लाभदायक ठरेल.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी नाशिकमध्ये आयटी पार्क उभारण्याचा योजनांचाही उल्लेख केला. दोन मजबूत कनेक्टिव्हिटीमुळे नाशिकच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासाला मोठा वेग मिळेल, असे त्यांनी नमूद केले.
नाशिकला ‘एचएएल’मुळे मोठा फायदा आहे. देशात जेव्हा डिफेन्स कॉरिडॉर बनत होते, तेव्हा आम्ही केंद्राकडे नाशिकची शिफारस केली होती, अशी माहिती देऊन मुख्यमंत्री म्हणाले, डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगसाठी नाशिक आणि पुणे हे नॅचरल डिफेन्स कॉरिडॉर आहेत, अशी माझी धारणा आहे. याठिकाणी डिफेन्स उत्पादनासाठी सक्षम इको-सिस्टीम असल्याने त्यावर विशेष काम केले जाणार आहे. तसेच, नाशिकमध्ये रामकाल पथाच्या उभारणीमुळे पर्यटनवाढीसही चालना मिळेल.