

नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जगभरातून नाशिकला येणाऱ्या भाविकांना अध्यात्माचा नवा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. २०२७ मध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा तंत्रज्ञान आणि नवसंकल्पनांनी परिपूर्ण असावा, असा आमचा संकल्प आहे. हा देशातील पहिला 'एआय' पुरस्कृत कुंभमेळा असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच सिंहस्थ कुंभमेळा नियोजनास विलंब झाल्याची कबुलीही त्यांनी दिली.
मनोहर गार्डन येथे सीआयआय यंग इंडियन्स नाशिक चॅप्टरतर्फे आयोजित 'डब्ल्यूआरसीएम' परिषदेच्या समारोपप्रसंगी आयोजित मुलाखतीत सीआयआय यंग इंडियन्सचे राष्ट्रीय अध्यक्ष तरंग खुराणा आणि निवेदक आनंद नरसिम्हण यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये झालेल्या कुंभमेळ्याने कुंभ आयोजनासाठी नवे मॉडेल तयार केले आहे. त्यातून लोकांमध्ये आपल्या संस्कृतीप्रति असलेली ओढ स्पष्ट दिसून आली. त्यामुळे नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुंभमेळा अधिक आव्हानात्मक ठरणार आहे. २०१५ मध्ये मी मुख्यमंत्री असताना, सिंहस्थ कुंभमेळ्याचे यशस्वी आयोजन केले होते. दुर्घटनेविना हा कुंभमेळा पार पडल्याचे समाधान वाटते.
प्रयागराजमध्ये कुंभमेळ्यासाठी साडेसात हजार हेक्टर जागा उपलब्ध होती, तर त्यांच्याकडे एकूण १५ हजार हेक्टर जागा आहे. त्या तुलनेत, आपण नाशिकमध्ये अवघ्या ३०० एकर जागेवर सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन करत असतो. अर्थात आखाड्यांच्या साधू- संतांचे प्रशासनाला मिळणारे सहकार्य यामुळेच कुंभमेळा यशस्वी होतो. प्रशासनातील काही उणिवा साधू- संत समजून घेत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या कुंभनगरींच्या विकासासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात आला आहे. आगामी काळात या क्षेत्रांचा विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून गर्दी व्यवस्थापन आणि इतर सुविधा सक्षमपणे चालवण्याचा सरकारचा मानस आहे. यासाठी एआर (ऑगमेंटेड रिॲलिटी) आणि व्हीआर (व्हर्च्युअल रिॲलिटी) तंत्रज्ञानाचा उपयोग करून भाविकांना अधिक समृद्ध अनुभव देण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे हा कुंभमेळा श्रद्धा आणि तंत्रज्ञानाचा समन्वय साधणारा ठरेल, असे मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले.
याप्रसंगी राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे यांच्यासह प्रशासनाचे सर्व वरिष्ठ अधिकारी, भाजपचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कुंभमेळा नियोजनाला विलंब झाल्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, मागील पाच वर्षे स्थित्यंतराची होती, त्यामुळे उशीर झाला, पण आता तयारी वेगाने सुरू आहे. २०२० मध्ये नियोजन सुरू केले असते, तर परिस्थिती अधिक चांगली असती, तरीही प्रशासकीय टीम सक्षम असून, कुंभमेळा यशस्वी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रयागराजमध्ये अधिकाऱ्यांनी १८- १८ तास दिलेल्या सेवेचा उल्लेखही त्यांनी केला.
प्रयागराजमध्ये ५० कोटी भाविक येऊन गेले, जात-पात वा श्रीमंत-गरीब असा भेदभाव न करता प्रत्येकाने आस्थेने स्नान केले. जेव्हा आपल्यावर आक्रमणे झाली, तेव्हा व्यापारात जगात आपले स्थान ३७ वे होते. भारताने नेहमीच अध्यात्माला स्थान दिले आहे, त्यामुळे युवांनी कुंभमेळ्याशी जोडले जाणे आवश्यक आहे. कुंभ ही संस्कृती असून, ती अर्थव्यवस्थेलाही बळ देते. पुढील वर्षी 'जीएसडीपी'च्या आकडेवारीत उत्तर प्रदेशची अर्थव्यवस्था आश्चर्यचकित करणारी असेल. त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्यात युवांनी योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले.
'एआय'मुळे २२ कोटी रोजगार कमी होण्याची शक्यता असली, तरी २४ कोटी नवीन रोजगार निर्माण होतील, असे सर्वेक्षणात म्हटले आहे. माजी अर्थमंत्र्यांनी विचारले होते की, ८ रुपये ७५ पैसे मी डिजिटल करू शकतो का? ते आज होत आहे. पान टपरीवाले आणि भाजीवालेही डिजिटल पेमेंट स्वीकारत आहेत. 'एआय'च्या मदतीने नवीन कौशल्ये विकसित करता येतील. टाटा इन्स्टिट्यूटने १० हजार महिलांना एआय तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण सुरू केले आहे. एआयचा लाभ स्पष्ट करून त्याविषयीची भीती दूर करायला हवी, असे मुख्यमंत्री म्हणाले.