नाशिक : राज्यात भाजप प्रणीत महायुती सरकार स्पष्ट बहुमतात असले तरी अद्याप नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा निर्णय झालेला नाही. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, 'नाशिकला लवकरच पालकमंत्री दिला जाईल. जोपर्यंत पालकमंत्री नसतात, त्यांचा चार्ज हा मुख्यमंत्र्यांकडे असतो.' यामुळे महायुतीतील अंतर्गत तिढ्यातून मुख्यमंत्री हेच नाशिकचे पालकमंत्री राहणार का, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
अडीच महिने उलटूनही नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा पेच सुटलेला नाही. 18 जानेवारीला मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन यांच्या नियुक्तीचे आदेश काढले. मात्र, त्यावर शिवसेनेने (शिंदे गट) नाराजी व्यक्त केली. त्यामुळे 24 तासांत महाजन यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्यात आली. त्यानंतर नाशिक दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार असो की, मंत्रिमंडळातील तब्बल अर्धा डझन मंत्री यांनी सर्वांनीच सांगितले की, पालकमंत्र्यांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील अन् लवकरच पालकमंत्री मिळेल. दरम्यान, हा तिढा राज्याच्या दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे गेला. त्यांच्या दौऱ्यातून नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपकडे राहणार असल्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात शासनादेश निघाला नाही.
या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच नाशिक दौऱ्यावर येणारे मुख्यमंत्री फडणवीस हे भाष्य करतील अन् पालकमंत्रिपदाचा तिढा सुटेल, अशी अटकळ बांधली जात होती. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रकार परिषदेत विचारले असता, 'लवकरच मिळेल पालकमंत्री' असे सांगत त्यावर अधिक भाष्य करणे टाळले. त्यानंतर मुख्यमंत्री हे शहरातील युवा उद्योजकांसोबतच्या चर्चासत्रात सहभागी झाले असता त्यावेळी उद्योजकांनी त्यांना प्रश्न विचारले. यात, नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कधी सुटणार? अशीही विचारणा झाली. त्यावर फडणवीस यांनी आम्ही नाशिकला पालकमंत्री देऊ, जोपर्यंत पालकमंत्री नसतात, त्याचा चार्ज मुख्यमंत्र्यांकडे असतो, असे वक्तव्य केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.