नाशिक : महापालिकेमुळे पेटताहेत अडीच हजार दिव्यांगांच्या चुली, काय आहेत योजना?

नाशिक : महापालिकेमुळे पेटताहेत अडीच हजार दिव्यांगांच्या चुली, काय आहेत योजना?
Published on
Updated on

भ्रष्टाचार, अनियमितता, घोळ आणि गोंधळ ही विशेषणे नाशिक महापालिकेच्या बाबतीत कायम उच्चारली जात असली, तरी दिव्यांग कल्याणाच्या क्षेत्रात महापालिकेच्या समाजकल्याण विभागाने मारलेली भरारी उल्लेखनीय अशीच आहे. विकलांगतेमुळे दररोजची पोटाची खळगी भरणेही दुरापास्त झालेल्या तब्बल दोन हजार ७० बेरोगार दिव्यांगांना दरमहा तीन हजार रुपयांचे अर्थसाहाय्य महापालिकेच्या माध्यमातून दिले जात असून, आणखी ४९१ दिव्यांगांना अर्थसाहाय्य योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे.

महापालिकेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी विविध प्रकारच्या 12 कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. काही जाचक अटींमुळे अनेक दिव्यांगांना या योजनांचा लाभ घेता येत नव्हता. दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी राखीव असलेला निधीही खर्च होत नसल्यामुळे या योजनांच्या माध्यमातून दिव्यांगांचे जीवनमान उंचावण्याचा हेतूही सफल होणे अवघड झाले होते. दिव्यांगांच्या कल्याणासाठी कार्यरत संघटनांशी चर्चा केल्यानंतर या योजनांमधील काही जाचक अटी वगळून सुधारित योजनांची अंमलबजावणी करण्याचा तसेच दिव्यांगांसाठी अर्थसाहाय्य देण्याच्या योजनेत मूलभूत बदल करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. त्यानंतर खऱ्या अर्थाने दिव्यांग कल्याण योजनांचा लाभ महापालिका क्षेत्रातील दिव्यांगांना मिळू लागला आहे. महापालिकेच्या माध्यमातून प्रौढ बेरोजगार दिव्यांगासाठी अर्थसाहाय्य योजना राबविली जाते. या योजने अंतर्गत सुरुवातीला ४० वर्षांवरील दिव्यांगांना दरमहा दोन हजार रुपये दिले जात होते. १८ ते ४० वयोगटातील बरेचसे दिव्यांग हे कोणत्याही प्रकारचा व्यवसाय व काम करण्यास असमर्थ असतात. त्यामुळे त्यांचाही या योजनेत समावेश करून आता या योजनेतील ४० वर्षांवरील दिव्यांसांठीची अट वगळण्यात आली आहे. दिव्यांगांना दरमहा दिल्या जाणाऱ्या अनुदानातही एक हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वर्षापासून बेरोजगार दिव्यांगांना दरमहा तीन हजार रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जात आहे. सद्यस्थितीत २०७० दिव्यांगांना अर्थसाहाय्य दिले जात आहे. दरमहा ६२ लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिव्यांगांच्या बँक खात्यावर थेट जमा करण्यात येत आहेत. आता आणखी ४९१ बेरोजगार दिव्यांगांसाठी अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले आहे.

दिव्यांगांना विवाहासाठी १ लाखाचे अर्थसाहाय्य

महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांना विवाहासाठी एक लाख रुपयांचे अर्थसाहाय्य दिले जाते. दिव्यांग व्यक्तीने दुसऱ्या दिव्यांग व्यक्तीशी विवाह केल्यास अशा नवविवाहित दिव्यांग जोडप्याला या योजनेचा लाभ दिला जातो. विवाह झाल्याच्या तीन महिन्यांच्या आत अर्थसाहाय्य मिळण्याकरिता अर्ज करणे आवश्यक आहे. या योजने अंतर्गत मिळणाऱ्या अर्थसाहाय्यापैकी ५० हजारांची रक्कम फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवली जाते. बचत प्रमाणपत्र किंवा पाच वर्षांची फिक्स डिपॉझिट पावती सादर केल्यानंतरच उर्वरित ५० हजारांची रक्कम अदा केली जाते.

अशा आहेत दिव्यांग कल्याणाच्या योजना

* कर्णबधिर दिव्यांगांना सर्जरीसाठी पाच लाखांपर्यंत अर्थसाहाय्य

* दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी एक लाखापर्यंत अर्थसाहाय्य

* दिव्यांग बेरोजगारांना दरमहा तीन हजार अर्थसाहाय्य

* दिव्यांग विद्यार्थांच्या पालकांसाठी प्रशिक्षण योजना

* दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती व व्यवसाय प्रशिक्षण योजना

* साहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाकरिता अर्थसाहाय्य

* विशिष्ट गरजा असलेल्या दिव्यांगांकरिता अर्थसाहाय्य

* दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांच्या सक्षमीकरणासाठी योजना

* गतिमंद, बहुविकलांगांसाठी अर्थसाहाय्य योजना

* दिव्यांग खेळाडूंसाठी अर्थसाहाय्य योजना

* दिव्यांग विवाह अर्थसाहाय्य योजना

* एमपीएससी, यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण दिव्यांगांसाठी शिष्यवृत्ती योजना

महापालिकेच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी १२ विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी केली जात आहे. शहरातील दिव्यांगांनी या योजनांचा लाभ घ्यावा.

– प्रशांत पाटील, उपायुक्त, समाजकल्याण विभाग, मनपा.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news