

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती देण्यासाठी राज्य शासनाने आणखी १,२०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नगरविकास विभागाने या संदर्भातील शासन निर्णय जारी केला असून, हा निधी सिंहस्थाशी संबंधित मंजूर विकासकामांसाठी खर्च करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
यापूर्वी सिंहस्थाच्या विविध विकासकामांसाठी टप्प्याटप्प्याने २८३ कोटी, ७१७ कोटी, ५०१.४० कोटी आणि ३९६.६० कोटी असा एकूण १,८९८ कोटी रुपयांचा निधी वितरित झाला होता. यानंतर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सिंहस्थासाठी तीन हजार कोटी रुपयांची पुरवणी मागणी मंजूर झाली. त्यातील पहिल्या टप्प्यात १,२०० कोटी रुपयांचे वितरण करण्यास वित्त विभागाने मान्यता दिली.
त्यामुळे आतापर्यंत सिंहस्थासाठी वितरित निधी ४,२९८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. शासनाने या निधीच्या वापराबाबत काही महत्त्वाच्या अटी घातल्या आहेत. निधी केवळ मंजूर विकासकामांवरच खर्च करावा, संबंधित कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता मिळाल्यानंतरच निधी वितरित करावा, तसेच खर्चानंतर उपयोगिता प्रमाणपत्र तातडीने शासनाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
निधीच्या वापराची जबाबदारी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा विभागीय आयुक्त यांच्यावर सोपविली आहे. या नव्या निधीमुळे सिंहस्थासाठी प्रस्तावित रस्ते, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, वाहतूक, नदीघाट, सार्वजनिक सुविधा, इतर पायाभूत विकासकामांना मोठा वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सिंहस्थासाठी गंगापूर रोडला समांतर नवा रस्ता, महापौरांची महासभेत घोषणा
आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी महापालिकेने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गंगापूर रोडवरील वाढता वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी या रस्त्याला समांतर नवीन पर्यायी मार्ग विकसित केला जाणार असून, त्याचा समावेश सिंहस्थ कुंभमेळा विकास आराखड्यात करण्यात आल्याची घोषणा महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी महासभेत केली. -
गेल्या काही वर्षांत गंगापूर रोड परिसरात झपाट्याने नागरीकरण झाले असून, कॉलेज रोड, आनंदवली, सिटी सेंटर मॉल तसेच सिरीन मेडोज परिसरात वाहतुकीची मोठी वर्दळ निर्माण झाली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात त्र्यंबकेश्वरकडे जाणारी वाहतूकही याच मार्गावरून होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण होते. ही समस्या लक्षात घेऊन सुमारे सात ते आठ किलोमीटर लांबीचा समांतर रस्ता विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महापौरांनी सांगितले की, हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर गंगापूर रोडवरील वाहतुकीचा ताण सुमारे ३० ते ४० टक्क्यांनी कमी होण्याची अपेक्षा आहे. या रस्त्यासाठी आवश्यक जमीन कन्स्ट्रक्शन टीडीआरच्या माध्यमातून संपादित केली जाणार असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया वेगाने पूर्ण करून कामाला गती दिली जाणार आहे.
याशिवाय, विस्डम हायस्कूल परिसरातून गोदावरीच्या उजव्या व डाव्या कालव्यालगतचा रस्ता विकसित करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे आठ ते नऊ मीटर रुंद आणि नऊ किलोमीटर लांबीचा हा रस्ता मखमलाबाद लिंक रोडला जोडला जाणार आहे. त्यामुळे आनंदवली, गंगापूर गाव, दसक आणि मखमलाबाद परिसरातील नागरिकांना पेठ रोड व त्र्यंबक रोडकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे. कालव्यालगतचा हा रस्ता विकसित करताना वृक्षारोपण आणि सुशोभीकरणावरही भर दिला जाणार आहे.
सिंहस्थासाठी उपजिल्हाधिकारी पदाला शासनाची मंजुरी, गत अधिकारी वर्ग-३ पद तात्पुरते उपजिल्हाधिकारी वर्ग-अ पदामध्ये रूपांतरित
नाशिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात तात्पुरत्या स्वरूपात उपजिल्हाधिकारी (वर्ग-अ) संवर्गातील एक पद निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे.
राज्य सरकारच्या महसूल व वन विभागाने गुरुवारी (दि.१६) हा शासन निर्णय निर्गमित केला. तसेच सध्या जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले स्वागत अधिकारी (वर्ग ३) हे पद १ ऑगस्ट २०२६ ते ३१ ऑगस्ट २०२८ या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरूपात उपजिल्हाधिकारी (वर्ग - अ) पदामध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यादरम्यान देश-विदेशातील अतिमहत्त्वाच्या व्यक्ती, मान्यवर आणि विविध शासकीय प्रतिनिधींच्या वाढत्या भेटींचे नियोजन, प्रोटोकॉल व समन्वय प्रभावीपणे करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
या पदासाठी सातव्या वेतन आयोगानुसार एस- २० वेतनश्रेणी लागू राहणार असून, वार्षिक अंदाजित खर्च सुमारे १४.०१ लाख रुपये इतका अपेक्षित आहे. हा खर्च विद्यमान स्वागत अधिकारी पदासाठी उपलब्ध निधीतून भागविण्यात येणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे. या शासन निर्णयानुसार हे पद केवळ सिंहस्थ कालावधीपुरतेच अस्तित्वात राहणार आहे. कुंभमेळ्याच्या कालावधी पुरतेच अस्तित्वात राहणार आहे.