

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सिंहस्थ कुंभमेळा २०२७दरम्यान भाविकांना तातडीची आणि सक्षम आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने व्यापक आरोग्य आराखडा तयार केला आहे. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या दोन्ही ठिकाणी रुग्णालयांची वाढीव क्षमता, घाटांवर तात्पुरते अतिदक्षता कक्ष, विविध भागांत ओपीडी सेवा तसेच रिले सिस्टिमवर आधारित रुग्णवाहिका व्यवस्था उभारण्यात येणार आहे.
नाशिक शहरातील एकूण खाट क्षमता १ हजार ३०५ वरून १ हजार ९४५ पर्यंत वाढविण्यात येणार असून, त्यात १८५ आयसीयू खाटांचा समावेश असेल. तात्पुरत्या आरोग्य सुविधांद्वारे ६४० अतिरिक्त खाटा उभारण्यात येणार आहेत.
तपोवन येथे १०० खाटांचे रुग्णालय तसेच नांदूर (साधुग्राम) येथे १० खाटांची सुविधा उभारण्यात येणार आहे. शहरातील सर्व १३ घाटांच्या दोन्ही बाजूंना तात्पुरते अतिदक्षता कक्ष कार्यान्वित केले जाणार असून, २१ ठिकाणी ओपीडी सेवा आणि १९ ठिकाणी रुग्णालये व वैद्यकीय युनिट्स उभारली जाणार आहेत.
पार्किंग क्षेत्रांचाही त्यात समावेश असेल. शहरातील विद्यमान ६२१ खासगी रुग्णालयांमधील १२ हजार ८०२ खाटा तसेच पाच वैद्यकीय महाविद्यालयांतील १ हजार २७५ खाटा या रिझर्व्ह क्षमता म्हणून वापरण्यात येणार आहेत. रुग्णवाहिका व्यवस्थेतही मोठी वाढ करण्यात येणार असून, २५ नवीन आणि ७३ भाडेतत्त्वावरील रुग्णवाहिका रिले सिस्टिमद्वारे कार्यरत राहतील.
रिले मॉडेलवर रुग्णवाहिका
त्र्यंबकेश्वरमध्ये सध्या उपलब्ध असलेली ५० खाटांची क्षमता वाढवून ती १२० पर्यंत नेण्यात येणार असून, त्यात २७ आयसीयू खाटांचा समावेश असेल. तात्पुरत्या सुविधांद्वारे ७० अतिरिक्त खाटा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय ४०० खाटांच्या क्षमतेची चार नवीन रुग्णालये प्रस्तावित आहेत.
कुंभमेळादरम्यान प्रमुख ठिकाणी तीन महिन्यांसाठी प्रत्येकी तीन खाटांची २५ तात्पुरती रुग्णालये सुरू केली जाणार आहेत. पर्वणी काळात तात्पुरते अतिदक्षता कक्ष कार्यान्वित ठेवण्यात येणार आहेत. येथेही २५ नवीन आणि १६ भाडेतत्त्वावरील रुग्णवाहिका रिले मॉडेलवर कार्यरत राहणार आहेत. दोन्ही ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर, एमबीबीएस व बीएएमएस वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, फार्मासिस्ट, एएनएम आणि सहायक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
घाट, पार्किंग, साधुग्राम अशा प्रत्येक ठिकाणी आरोग्यसेवा उपलब्ध ठेवणे हे आमच्या नियोजनाचे केंद्रबिंदू आहे. प्रतिसादाचा वेग, व्यापक कव्हरेज आणि विश्वासार्ह सेवा यावर विशेष भर देण्यात आला आहे.
- शेखर सिंह, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त