

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर येथील धार्मिक व ऐतिहासिक वारसास्थळांच्या संवर्धनाला गती मिळाली आहे. कुंभमेळा तयारीचा महत्त्वाचा भाग म्हणून ही कामे हाती घेण्यात आली असून, कुंभमेळा प्राधिकरणाच्या समन्वयाने राज्य पुरातत्त्व विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत 'समृद्ध वारसा' जतन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
मंदिरे, कुंड आणि तीर्थस्थळे ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून, लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असल्यामुळे त्यांच्या मूळ स्थापत्य वैशिष्ट्यांचे जतन करीत संवर्धनावर भर देण्यात येत आहे. या अंतर्गत एकूण १६ वारसा संवर्धन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी सुमारे ५५.७२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
नाशिकमधील ६ आणि त्र्यंबकेश्वरमधील १० अशा दोन प्रमुख ठिकाणी ही कामे सुरू आहेत. सर्व प्रकल्पांना कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत. या कामांमध्ये प्राचीन दगडी मंदिरांचे जतन, समाधिस्थळांची दुरुस्ती, कुंभमेळ्यातील धार्मिक विर्धीमध्ये महत्त्वाची भूमिका असलेले पवित्र कुंड व तीर्थांचे मजबुतीकरण व सुशोभीकरणाचा समावेश आहे.
वाढत्या भाविकांचा विचार करीत मंदिरांचे संवर्धन, कुंड व तीर्थांचे पुनरुज्जीवन वारसास्थळांच्या परिसराचे नियोजन, सुरक्षितता आणि सुकर प्रवेशावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. नाशिक शहरात नारोशंकर मंदिर, सुंदरनारायण मंदिर, काशी विश्वेश्वर मंदिर व इतर मंदिर संकुले तसेच ऐतिहासिक भिंर्तीचे जतन आणि परिसर विकासाची कामे सुरू आहेत.
या माध्यमातून शतकानुशतके टिकून असलेल्या वास्तूंचे स्थैर्य वाढविण्याबरोबरच भाविकांसाठी अधिक सुटसुटीत आणि सुरक्षित व्यवस्था निर्माण केली जात आहे. त्र्यंबकेश्वर येथे कुशावर्त कुंड, बिल्वतीर्थ, प्रयागतीर्थ, इंद्रकुंड आणि गौतमेश्वर मंदिर व तलाव यांसारख्या महत्त्वाच्या स्थळांवरील संवर्धनाची कामे प्रगतिपथावर आहेत.
कुंभमेळ्यातील स्नान आणि धार्मिक विर्धीचे केंद्र असलेल्या या स्थळांच्या दृष्टीने संरचनात्मक मजबुतीकरण आणि परिसर व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. बहुतांश कामे डिसेंबर २०२६ ते मार्च २०२७ या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन असून, कुंभमेळ्यापूर्वी वारसास्थळे सक्षम आणि सज्ज करण्याचा उद्देश आहे.
मंदिरांचे संवर्धन, कुंड व तीर्थांचे पुनरुज्जीवन
ऐतिहासिक वारसा संवर्धन मोहिमेंतर्गत पारंपरिक पद्धतीने मंदिरांचे संवर्धन, कुंड व तीर्थांचे पुनरुज्जीवन जुन्या वास्तूंचे संरचनात्मक मजबुतीकरण तसेच भाविकांसाठी सुरक्षित व सुसूत्र परिसर विकासाची कामे करण्यात येत आहे. यासाठी कुंभमेळा प्राधिकरणाच्या माध्यमातून राज्य पुरातत्त्व विभागाकडून राबवण्यात येत असलेल्या मोहिमेंतर्गत नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील समृद्ध वारसा जतन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.