

नाशिक : 'टीसीएस' आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे कथित लैंगिक शोषण व जबरदस्तीने धर्मांतर प्रकरणात अटकेत असलेल्या चार आरोपींची पोलिस कोठडी न्यायालयाने २ मेपर्यंत वाढवली आहे. अधिक तपासासाठी आरोपींची कोठडी वाढविण्याची मागणी सरकारी पक्षाकडून करण्यात आली होती, ती मान्य करत न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे संबंधित आरोपींना आणखी काही दिवस पोलिस कोठडीत राहावे लागणार आहे.
मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक १६६/२०२६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी तौसिफ बिलाल अत्तार (३७), दानिश एजाज शेख (३२), शाहरुख हुसेन शौकत कुरेशी (३४) व रझा रफीक मेमन (३५) यांना २३ एप्रिल २०२६ रोजी मध्यवर्ती कारागृह, नाशिकरोड येथून ताबा वॉरंटवर पोलिसांनी ताब्यात घेतले होते.
आरोपींना यापूर्वी न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. बुधवारी पुन्हा त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत सरकारी पक्षाने कोठडी वाढविण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य करत २ मेपर्यंत कोठडी वाढवली.
दरम्यान, या प्रकरणातील प्रमुख संशयित निदा खान अद्याप फरार असून, तिच्या जामीन अर्जावर २ मे रोजी सुनावणी होणार आहे. तसेच टीसीएस कंपनीच्या स्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चेनानी व इतर आरोपींच्या जामीन अर्जावर ५ मे रोजी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.