Nashik Sand Protest | लोहोणेर येथे वाळू घाट ताबा प्रक्रियेला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; प्रशासन माघारी

जळगाव येथील ठेकेदार दीपक पाटील हे महसूल विभाग आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल
Deola Lohoner farmers agitation
देवळा / गिरणा नदीपात्रातील बाळू लिलावाचा ताबा देण्यासाठी आलेले तहशिलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधतानाPudhari
Published on
Updated on

Deola Lohoner farmers agitation

देवळा : देवळा तालुक्यातील लोहोणेर शिवारातील गिरणा नदीपात्रातील वाळू घाटाचा ताबा घेण्यासाठी बुधवारी (दि. २९) जळगाव येथील ठेकेदार दीपक पाटील हे महसूल विभाग आणि पोलिसांच्या कडक बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. मात्र, परिसरातील शेतकरी व ग्रामस्थांनी एकत्र येत या प्रक्रियेला तीव्र विरोध दर्शविल्याने प्रशासनाला माघार घ्यावी लागली.

लोहोणेरसह विठेवाडी, भऊर, सावकी, खामखेडा आणि ढेंगोडा परिसरातील शेकडो शेतकरी व तरुण घटनास्थळी जमा झाले होते. सध्या तीव्र उकाडा आणि पाण्याची टंचाई असल्याने जनावरांसाठी पाणी उपलब्ध नाही. गिरणा नदीवरील पाणीपुरवठा योजना कोरड्या पडल्या असून, शेतीसाठीही पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत वाळू लिलाव प्रक्रिया राबविण्याला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला.

Deola Lohoner farmers agitation
Nashik Accident | वणी–नांदुरी मार्गावर वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको, वाहतूक ठप्प

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते कुबेर जाधव यांनी तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्याकडे लिलाव प्रक्रिया तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम यांनीही या लिलावाला सातत्याने विरोध दर्शवित शासनाच्या भूमिकेवर टीका केली.

भऊर येथील प्रगतिशील शेतकरी बाबा पवार यांनी तीव्र भावना व्यक्त करत, “गरज पडल्यास उपोषण करू, पण गिरणा नदीतील वाळू बाहेर जाऊ देणार नाही,” अशी भूमिका घेतली.

परिसरातील सर्व गावांतील शेतकऱ्यांनी लोहोणेरच्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शविला. दरम्यान, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी शासन निर्णयानुसार प्रक्रिया राबवावी लागते, मात्र शेतकऱ्यांच्या भावना पंचनाम्यात नमूद करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येतील, अशी भूमिका घेतली. त्यामुळे काही काळ निर्माण झालेला तणाव निवळला.

Deola Lohoner farmers agitation
Nashik Drug Seizure - वर्षभरात ६८ कोटींचे अमली पदार्थ जप्त

ठेकेदाराला संतप्त शेतकऱ्यांनी बोलूही दिले नाही. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिस निरीक्षक सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे वाळू घाट ताबा प्रक्रिया स्थगित करण्यात आली. याला शेतकरी एकजुटीचा विजय मानला जात असून, महसूल विभागाने पंचनाम्याद्वारे शेतकऱ्यांच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.

शासनाला महसूल हवा असेल, तरी गिरणा नदी आमची आई आहे. तिचे नुकसान होऊ देणार नाही. गरज पडल्यास आम्ही इतर मार्गाने महसूल उभारू; मात्र वाळू लिलाव कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही.

- महेंद्र आहेर, शेतकरी, झिरेपिंपळ (विठेवाडी)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news