

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनातील १,८२५ वृक्षतोडीविरोधातील आंदोलनात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील उडी घेतली आहे. कुंभमेळा हा समाजहिताचा, राष्ट्रहिताचा असला तरी त्यासाठी झाड तोडू नये, अशी भूमिका हजारे यांनी मांडली आहे. त्यामुळे वृक्षतोडीविरोधातील लढ्याला बळ मिळाले आहे.
नाशिकमध्ये २०२७ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होत आहे. या कुंभमेळ्यासाठी तपोवनातील १२०० एकर क्षेत्रावर साधुग्रामची उभारणी प्रस्तावित आहे. यापैकी महापालिकेच्या ताब्यातील ५७ एकर जागेतील १८२५ झाडे तोडण्याचा प्रस्ताव महापालिकेने तयार केला आहे. त्यास पर्यावरणप्रेमी, वृक्षप्रेमींनी तसेच अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासारख्या सेलिब्रेटींनी कडाडून विरोध दर्शवित आंदोलन उभारले आहे.
या आंदोलनाला शिवसेना(उबाठा), मनसे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस या विरोधी पक्षांबरोबरच सत्तारूढ महायुतीतील शिवसेना(शिंदे गट) व राष्ट्रवादी अजित पवार गटाने विरोध दर्शविल्याने भाजपची कोंडी झाली आहे. आता या वृक्षतोडीला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी देखील विरोध दर्शविला आहे.
अण्णा हजारे म्हणाले की, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षतोड केली जाणार आहे. वृक्षांमुळे मनुष्यच नाही तर वन्य प्राण्यांना देखील जीवदान मिळते. कुंभमेळा हा जरी समाजहिताचा आणि राष्ट्र हिताचा असला तरी त्यासाठी झाड तोडू नयेत. फारच आवश्यक असेल तर छोटी झाड तोडावेत. मात्र, मोठ्या झाडांना तोडू नये, अशी माझी विनंती असल्याचे त्यांनी म्हटले आहे.