Nashik Tapovan Tree Cutting : कुंभमेळा हवा पण, निसर्गाची कत्तल नको!

Pudhari Ground Report : तपोवनातील वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा उठाव, प्रशासनाला थेट इशारा
नाशिक
तपोवनातील वृक्षतोडीविरोधात नागरिकांचा उठाव, प्रशासनाला थेट इशारा (सर्व छायाचित्रे : हेमंत घोरपडे )
Published on
Updated on

नाशिक : आसिफ सय्यद / सतीश डोंगरे

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवनात साधुग्राम उभारण्याच्या नावाखाली १८०० झाडांची केली जाणारी कत्तल नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमी, नागरिकांच्या संतापाची ज्वाला बनली आहे. तपोवनातील शेकडो झाडांना कुऱ्हाड लावण्याच्या निर्णयावर नाशिककर आक्रमक पद्धतीने रस्त्यावर उतरल्यानंतर प्रशासनाची झोप उडाली आहे. गोदाकाठचा हिरवाईचा श्वास कापण्याचा हा सरकारी डाव नागरिकांनी उघडपणे रोखण्याचा निर्धार केला आहे.

तपोवनातील नैसर्गिक वनक्षेत्र हा नाशिकचा प्राणवायू तलाव आहे. पक्ष्यांचे अधिवास, नैसर्गिक सावली, जैवविविधतेची शृंखला… हे सर्व साधुग्रामासाठी जागा मोकळी करण्याच्या नावाखाली विनाशाच्या उंबरठ्यावर नेले जात आहे. त्याविरोधात नाशिककर एकवटले असून 'कुंभमेळा पवित्र आहे, पण निसर्गाची कत्तल अधिक पाप आहे', अशी ठाम भूमिका घेत पर्यावरणप्रेमींनी प्रशासनाच्या भूमिकेवर आसूड ओढला आहे. नाशिकमध्ये या वृक्षतोडीच्या विरोधाचा स्वर इतका तीव्र झाला की नागरिकांनी झाडांना मिठी मारत 'चिपको' आंदोलन पुन्हा जिवंत केले. महिला, विद्यार्थी, तरुणाई, सामाजिक संस्था सगळे एकत्र येऊन झाडांसमोर मानवी भिंत उभारली. घोषणांनी वातावरण थरथरले. या आंदोलकांच्या डोळ्यांतील संताप आणि झाडांशी असलेली नाळ पाहून प्रशासनाची झोप उडाली नसती तर नवलच. या झाडतोडीविरोधात नागरिकांनी दाखल केलेल्या ९०० हरकतींमुळे प्रशासनावर अभूतपूर्व दबाव आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखल झालेल्या हरकती म्हणजे तपोवनच्या संरक्षणासाठी नागरिकांचा थेट रणघोषच. 'साधुग्राम तात्पुरता, विनाश कायमचा' हा संदेश आता शहरभर पोहोचला आहे. नदीकाठचे पर्यावरणीय संतुलन, तापमानवाढ, धूळकणांचा कहर, हवामानातील बदल याबाबत नागरिकांनी दिलेला वैज्ञानिक आक्रोश प्रशासनाला धडकी भरवणारा ठरत आहे. तपोवनातील झाडे शांत आहेत, पण त्यांच्या रक्षणासाठी नाशिककरांचा आवाज आज संपूर्ण शहर दणाणून सोडत आहे. प्रशासन समोरच्या या आक्रोशाकडे दुर्लक्ष करणार की हिरवाईचा सन्मान करणार, संपूर्ण नाशिक याची प्रतीक्षा करत आहे.

नाशिक
Simhastha Kumbh Mela Nashik: कुंभाला कालावधी कमी; विकासकामांना द्या गती!

कुंभमेळा मंत्री मैदानात...

प्रस्तावित वृक्षतोडीला विरोध वाढताच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन मैदानात उतरले. त्यांनी 'एका झाडाच्या बदल्यात दहा नवीन झाडे लावू' अशी घोषणा केली. मात्र पर्यावरणप्रेमींना ही घोषणा भावलेली नाही. 'शेकडो वर्षांची झाडे तोडून दहा रोपे लावणे म्हणजे डोळ्यांत धूळफेक', असा कठोर आरोप होत आहे. रोपे मोठी होण्यासाठी दशकं लागतात; पण परिसंस्थेचा विनाश एका दिवसात होतो, हे नागरिक प्रशासनाला पुन्हा पुन्हा सांगत आहेत.

सुनावणी केवळ औपचारीकता?

महापालिका आयुक्तांनी साधुग्रामासाठी जागा मोकळीक आवश्यक असल्याचे सांगत प्रशासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला असला, तरी नाशिककर हे सरळसरळ नाकारत आहेत. वृक्षतोडीविरोधात प्राप्त ९०० हरकतींवर सोमवारी, दि. २४ सुनावणी होत आहे. मात्र, 'सुनावणी ही केवळ औपचारिकता. निर्णय आधीच झाला आहे,' असा नागरिकांचा स्पष्ट आरोप आहे. प्रशासनाचे 'अपरिहार्य' हे कारण आता शहराला मान्य नाही.

वृक्षतोडीला पर्याय हवाच!

नागरिक, तज्ज्ञ आणि पर्यावरणप्रेमीकडून महापालिका प्रशासनाला काही पर्याय सुचविले जात आहेत. त्यात झाडांचे प्रत्यारोपण, साधुग्रामाचा लेआउट बदलणे, कमी जागेत मॉड्युलर निर्मिती करणे, पर्यायी शासकीय जमिनींचा वापर या पर्यायांचा समावेश आहे. या सर्वांचा विचार न करता थेट वृक्षतोड करण्यावर प्रशासन आग्रही राहणे हे नाशिककरांना अस्वीकार्य आहे. काही महिन्यांच्या कार्यक्रमासाठी शतकीय हिरवाईचा बळी देण्यामागे कोणते लॉबिंग आहे, असा संशयही तीव्र होत आहे.

तपोवन बनले संघर्षाचे केंद्र

तपोवन आता संघर्षाचे केंद्र बनले आहे. एका बाजूला सरकारी यंत्रणा, वेळापत्रक, बांधकामे, खर्च आणि दबाव. दुसऱ्या बाजूला नागरिक, निसर्ग, हवा, पाणी, जीवन आणि भविष्य. 'विकासाच्या नावाखाली विनाश स्वीकारणार नाही,' अशी नागरिकांची घोषणाच परिस्थितीचे गांभीर्य सांगते. निसर्ग विरुद्ध विकास हा जुना संघर्ष असला तरी नाशिकने आता जे आव्हान उभे केले आहे, ते टाळता येणारे नाही. कुंभमेळा पवित्र आहे; पण पवित्रतेच्या नावाखाली निसर्गाचा बळी देणे हे नाशिककरांना अमान्य आहे. शहराचा ठाम आवाज, कुंभमेळा हवा,पण तपोवनाची हत्या नको!

काय आहे महापालिका आयुक्तांचे म्हणणे?

साधुग्रामच्या उभारणीला बाधा आणणारे आणि १० वर्षांपेक्षा कमी वयाचे वृक्ष किंवा छोटे झुडुपे यांची आवश्यकता नुसार तोड केली जाईल अन्यथा कुठलीही इजा पोहचवली जाणार नाही. अधिक वयाचे, जुने व पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्वाचे वृक्ष पूर्णपणे जतन केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक मनिषा खत्री यांनी दिली आहे. नाशिक महापालिकेतर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. वृक्ष जतन व संवर्धन ही सर्वांचीच जबाबदारी आहे. कुंभमेळा हे नाशिकचे जागतिक स्वरूपाचे आयोजन असून, शहराची स्वच्छता, पर्यावरण आणि विकासकामांमध्ये सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त खत्री यांनी केले आहे.

Nashik Latest News

काय आहे कुंभमेळा मंत्री महाजन यांचे म्हणणे?

आगामी कुंभमेळा हा नाशिककरांचा अभिमान असून देश-विदेशातील लाखो साधू-महंत साधुग्राम येथे येणार आहेत. त्यांच्या सोयीसाठी आवश्यक त्या प्रमाणात सुविधा केल्या जाईल. ज्या वृक्षांचे पुनर्रोपण शक्य आहे त्यांना अन्यत्र स्थलांतरित करून पुनर्रोपन केले जाईल. निसर्गाचा ऱ्हास होणार नाही याची पूर्ण काळजी घेत कार्यवाही केली जाईल. फाशीचा डोंगर, पेठ रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड केली जाणार आहे. एका झाडाच्या बदल्यात दहा झाडांची लागवड केली जाणार असल्याची ग्वाही कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.

नाशिक कुंभमेळा मंत्र्यांना बिबट्या मागे धावताना सर्वांनी पाहिले. तपोवनातील झाडे वाचविण्याचा विचार मात्र ते करत नाहीत, उलट पत्रकार परिषद घेऊन झाडे तोडावे लागतील असे वक्तव्य करतात. एक झाड तोडल्यावर दहा झाडे लाऊ, असे ते म्हणत आहेत, मात्र या आधी किती झाडे लावली त्याती किती जगली, याचा हिशेब जाहीर करावा. वृक्षतोड करून हरित कुंभ कसा साजरा होणार? ही कृती कायद्याच्या, संविधानिक मूल्यांच्या विरोधात आहे.

कॉ. राजू देसले, राज्य सचिव, भाकप.

आकडे सांगतात...

  • १७७० झाडे

  • ५४ एकर क्षेत्र

  • १२०० एकर जागेवर साधुग्राम उभारणार

  • ९०० हरकती

  • ३५ टक्के झाडांची कत्तर करण्याची तयारी

  • १० वर्षाआतील झाडे तोडण्याचा प्रस्ताव

भव्य वड, चिंच, पिंपळ, उंबर झाडांवर फुल्या

याठिकाणी असलेल्या जुन्या व भव्य वड, चिंच, पिंपळ, उंबर या झाडांवर देखील महापालिकेकडून पिवळ्या फुल्या मारण्यात आल्या आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमी आणखीनच आक्रमक झाले आहेत. हे झाडे जुनी व भव्य असून, मिठीत देखील मावत नाहीत. अशा जुन्या झाडांची कत्तल करणे कितपत योग्य राहिल, असा सवाल महापालिका अधिकाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

झाडांची कत्तल हा पर्याय नाहीच!

वृक्षवल्लीमध्येच साधू, महंतांसाठी निवासव्यवस्था उभारावी, असा आग्रह पर्यावरणप्रेमींचा आहे. ज्या झाडांचा अडथळा येऊ शकतो, अशा झाडांच्या फांद्या छाटून त्याखाली निवासव्यवस्था उभारली जावू शकते. त्यामुळे झाडांची कत्तल करणे हा अजिबातच यावरील मार्ग नसून, महापालिकेने यापर्यायाचा विचार करावा. प्रशासनाकडून झाडांचे पुर्नरोपण करण्याचे सांगितले जात असले तरी, प्रत्यक्षात ते शक्य नसल्याचे पर्यावरणप्रेमींचे म्हणणे आहे.

वृक्षांची कत्तलीला पर्याय शोधण्याचा महापालिका प्रशासनाने प्रयत्न करायला हवा. जर पर्याय शोधायचाच नाही, हे ठरवले असेल तर मग पर्याय सापडणारच नाही. योग्य नियोजन करून काही झाडांच्या केवळ फांद्या जरी काढल्या तरी, झाडांची कत्तल करायची गरज भासणार नाही. यावर नक्कीच विचारमंथन व्हायला हवे.

किरण चव्हाण, संचालक, ग्रीन स्पेसेस रिॲल्टी

महापालिका प्रशासन आणि पर्यारवरणप्रेमी यांनी संयुक्तपणे सर्व्हेक्षण करायला हवे. सर्वेक्षणाअंती जो निर्णय येईल, त्यानुसार पुढे जावे. याठिकाणी वड, चिंच, पिंपळ, उंबर ही झाडे तोडण्याबाबत महापालिकेने विचार करू नये. तसेच झाडांचे पुर्नरोपण करण्याचा पर्याय अयोग्य आहे. तसेच साधुग्राममध्ये आतापासून योग्य पद्धतीने वृक्षारोपण करून याठिकाणी राशी, चरक व नक्षत्र वन तयार करावे.

शेखर गायकवाड, आपलं पर्यावरण

धर्म आणि कुंभमेळा संयोजकांनी आपल्या माइंडसेटमधील सॉफ्टवेअर बदलण्याची गरज आहे. हे सॉफ्टवेअर पर्यावरणस्नेही धर्म आणि विधी या अनुषंगाने असायला हवे. मला या मंडळींना आव्हान आहे की त्यांनी सिद्ध करावे आमचा धर्म, प्रथा, विधी या पर्यावरण स्नेही आहेत. लाखो लोकांनी मिळून साजरा होणारा कुंभमेळा हा पर्यावरण स्नेही आहे.

राजेंद्र गाडगीळ, पक्षीमित्र

कुंभमेळ्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात असेल तर दुदैवीच आहे. सरकारने डोळे उघडायला हवेत. त्यांनी किती झाडे लावलीत याचा तरी किमान हिशोब द्यावा. लोकांनी आवाज उठवला की तो दाबला जातो, लोकशाही आहे की हुकुमशाही हेच कळत नाही. झाडांवरून राजकारण करण्यापेक्षा त्याची कत्तल होणार नाही याचा विचार करा.

सयाजी शिंदे, अभिनेता

झाडे तोडू नये हे प्रत्येकाचेच म्हणणे आहे. झाडे मुळासकट काढून त्यांना स्थानांतरीत करावे. कारण शिवपुराण, पद्मपुराण आणि ब्रम्हणपुराणामध्ये सांगितलेले आहे की, ज्या तीर्थ क्षेत्रावर ज्या देवतेचे स्थान आहे, तेथील झाडे त्या देवतेचे गण सांगितलेले आहेत. त्र्यंबकेश्वर येथील सर्व झाडे हे शिवगण, तर नाशिकमधील सर्व झाडे हे विष्णूगण सांगितले आहे. त्यामुळे संतांच्या 'वृक्षवल्ली आम्हा सोयरे' हा अभंग न राहता, त्याचे तंतोतंत पालन व्हायला हवे.

महंत अनिकेत शास्त्री देशपांडे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news