Nashik Subway Underpass : द्वारका, वडाळा नाक्यावर अंडरपास
नाशिक : द्वारका चौकातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कायमस्वरूपी तोडगा काढला आहे. त्यानुसार नाशिकहून नाशिकरोडकडे जाताना द्वारका चौकात आठशे मीटर लांबीचा अंडरपास तयार केला जाणार आहे.
नाशिकरोडकडे जाणाऱ्या अंडरपासला धुळ्याकडे जाणारी वाहतूकही जोडली जाणार असून वडाळानाका येथे तीनशे मीटर लांबीचा दुसरा अंडरपास तयार केला जाणार आहे. या अंडरपासच्या उभारणीसाठी द्वारका चौकातील भुयारी मार्ग मात्र तोडावे लागणार आहेत.
शहरातील वाहतुक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. प्रामुख्याने द्वारका आणि मुंबई नाक्यावरील वाहतूक कोंडीची समस्या थेट विधिमंडळापर्यंत पोहोचली आहे. द्वारका चौकात सहा बाजूने रस्ते एकत्र येतात, त्यामुळे येथे अभूतपूर्व वाहतूक कोंडी होते. ही कोंडी फोडण्यासाठी अनेक उपाय योजले गेले. भुयारी मार्ग तयार केला, तो मात्र निरुपयोगी ठरला. भुयारी मार्गावर केलेला कोट्यवधींचा खर्च अक्षरश: वाया गेला आहे. त्यानंतरही द्वारका चौकात तासन्तास वाहनांचा गोंगाट कायम असल्याने द्वारका सर्कल पूर्णपणे हटवून तेथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित सिग्नल सुरू करण्यात आले, मात्र तरीही वाहतूक सुरळित होताना दिसत नाही. वाहतूक कोंडीच्या प्रश्नावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी स्थळपाहणी करत उपाययोजना सुचविल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे द्वारकाच्या वाहतूक कोंडीप्रश्नी बैठक घेत राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणामार्फत (न्हाई) निधी खर्च करून वाहतूक समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ अधिकाऱ्यांनी बैठक घेत कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या वाहतूक कक्षामार्फत द्वारका चौकात सर्वेक्षण झाले. या सर्वेक्षणाचा आधार घेत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने द्वारका चौक, वडाळानाका भागात अंडरपास तयार करण्याची शिफारस केली आहे.
तीन अंडरपास तयार करणार
सारडा सर्कलकडून द्वारका चौकमार्गे नाशिकरोडकडे जाताना ८०० मीटरचा अंडरपास तयार केला जाणार आहे. या अंडरपासमधून नाशिकहून नाशिकरोडकडे तसेच नाशिकरोडहून नाशिककडे येणारी वाहतूक होईल. धुळेहून नाशिकरोडकडे व नाशिकरोडहून धुळे मार्गे जाण्यासाठी डावीकडे वळण घेऊन वडाळानाका सिग्नल येथे तीनशे मीटरचा अंडरपास तयार केला जाईल.
द्वारका चौकातील वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्यासाठी महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने अंडरपास उभारण्याची शिफारस केली आहे. प्राथमिक स्तरावर हे नियोजन असून त्यावर अंतिम निर्णय घ्यावयाचा आहे.
प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

