Nashik Sinnar Municipal Council Analysis : सिन्नरकरांचा व्यवहार्य कौल

सिन्नर नगर परिषद : निवडणूक विश्लेषण
Sinnar Municipal Council
Sinnar Municipal Council Pudhari News Network
Published on
Updated on

सिन्नर (नाशिक) : संदीप भोर

सिन्नर येथील नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते माजी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे यांचे समर्थक विठ्ठलराजे उगले यांनी लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून एकतर्फी विजय मिळविला.

या निकालामागे केवळ पक्षीय गणित नव्हे, तर शहर - उपनगरांच्या विकासाची अपेक्षा, कोकाटे यांच्या नेतृत्वावरचा विश्वास आणि स्थानिक राजकीय वास्तवाची जाण आदी घटकांचा प्रभाव दिसून येतो. यंदाची ही निवडणूक राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट यांच्यातच रंगल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले.

Sinnar Municipal Council
Nashik Sinner Election News : सिन्नरला राष्ट्रवादी अजित पवार गटाचा झेंडा

या निवडणुकीचा प्रचार संपला, तोपर्यंत अ‍ॅड. माणिकराव कोकाटे हे राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री या प्रभावी स्थानावर असल्यामुळे सिन्नर शहर व उपनगरांतील विकास योजनांसाठी शासनाकडून निधी आणून त्या प्रत्यक्षात राबविण्याची त्यांची क्षमता मतदारांच्या दृष्टीने महत्त्वाची ठरली. सत्ता असेल, तरच विकास हा व्यवहार्य विचार सिन्नरकरांनी या निवडणुकीत अधोरेखित केल्याचे निकालातून स्पष्ट होते. नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले विठ्ठलराजे उगले यांची प्रतिमा ही मुळातच सामान्यांच्या मदतीला धावून जाणार्‍या कार्यकर्त्याची आहे. यापूर्वी त्यांनी नगराध्यक्षपद भूषविल्याने त्यांच्या कार्यपद्धतीची ओळख नागरिकांना आहे. शहरातील मूलभूत सुविधांमध्ये अडथळे निर्माण झाले की, त्याच्या सोडवणुकीसाठी उगले यांचा हिरिरीने सहभाग असतो, हे निवडणूक काळातच पुन्हा एकदा प्रत्ययास आले.

कडवा पाणीपुरवठा योजनेचा 2 हजार केव्हीचा ट्रान्स्फॉर्मर अचानक नादुरुस्त झाल्यानंतर त्याची दुरुस्ती आणि पर्यायी व्यवस्थेची संपूर्ण जबाबदारी माजी मंत्री कोकाटे यांनी उगले यांच्याकडे सोपविली होती. जवळपास 15 ते 20 दिवस सातत्याने पाठपुरावा करत सिन्नरकरांना पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी त्यांनी केलेले रात्रंदिवसाचे प्रयत्न नागरिकांच्या नजरेतून सुटले नाहीत. या योजनेबाबत विरोधकांनी त्रुटी दाखवून आरोपांची झोड उठविली होती. त्या आरोपांत काही तथ्य असण्याची शक्यताही नाकारता येत नाही, मात्र अडथळ्यांची शर्यत पार करताना उगले यांनी दाखविलेली कार्यतत्परता त्यांच्या नेतृत्वशैलीची खरी ओळख ठरली. ‘व्ही राजे ग्रुप’ या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून उगले यांचा समाजातील वावर आधीपासूनच सक्रिय आहे.

Sinnar Municipal Council
Nashik Municipal Council Election Analysis : भाजपला छोबीपछाड देत शिंदे शिवसेना ठरली ‘धुरंधर’

विशेषतः तरुण, दीनदलित आणि गरजू घटकांच्या मदतीला धावून जाण्याची त्यांची कर्तव्यतत्परता संपूर्ण तालुक्याने अनुभवलेली आहे. त्याचाच थेट फायदा या निवडणुकीत त्यांना झाल्याचे दिसून आले. दुसरीकडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रमोद चोथवे उर्फ पिंटूकाका हेदेखील सामान्यांच्या मदतीला धावून जाणार्‍या स्वभावासाठी शहरात परिचित आहेत. त्यांना खासदार राजाभाऊ वाजे यांचा पाठिंबा होता. मात्र खासदार वाजे हे सध्या लोकसभेत विरोधी बाकावर आहेत. ते लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांचा पाठपुरावा करीत आहेत. त्यापैकी काही प्रश्न तडीस गेले आहेत. मात्र, सिन्नरच्या विकासासाठी ते राज्य सरकारकडून कितपत निधी खेचून आणू शकतील, याबाबत मतदारांच्या मनात शंका असावी. त्यामुळे तुल्यबळ उमेदवार असूनही चोथवे यांना जनतेने नाकारल्याचे दिसते. तथापि, नगर परिषदेच्या सत्तेतून मतदारांनी खासदार वाजे यांना पूर्णपणे बाजूला केले, असेही म्हणता येणार नाही. नगर परिषदेत एकूण 30 पैकी तब्बल 14 जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पारड्यात 13 जागा आल्या. नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेले असले, तरी सदस्यसंख्येच्या माध्यमातून मतदारांनी कोकाटे आणि वाजे या दोघांनाही सत्तेत स्थान दिल्याचेच हे द्योतक आहे. या निवडणुकीत भाजपचे युवा नेते उदय सांगळे यांच्याकडे प्रमुख विरोधी गट म्हणून पाहिले जात होते. खासदार वाजे यांचे काका हेमंत वाजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे भाजपला बळ मिळेल, असे भाकीत होते. मात्र निकालानंतर ते फारसे खरे ठरले नाही. हेमंत वाजे चौथ्या क्रमांकावर फेकले गेले, तर शिंदे सेनेचे नामदेव लोंढे यांनी आपले एकगठ्ठा मतदान राखून ठेवत एक जागा मिळविली. उदय सांगळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपला दोन जागा जिंकता आल्या, हेही नसे थोडके! सिन्नरच्या राजकीय इतिहासात गडाख - दिघोळे, दिघोळे - कोकाटे, वाजे- कोकाटे या प्रमुख नेत्यांच्या पलीकडे तिसर्‍या गटाला फारसे यश मिळाले नसल्याची पार्श्वभूमी पाहता, शिंदे सेना आणि भाजपचा हा चंचूप्रवेश त्यांच्यासाठी समाधानकारक म्हणावा लागेल. एकूणच, सिन्नर नगर परिषद निवडणुकीत मतदारांनी भावनिक नव्हे, तर व्यवहार्य निर्णय घेतल्याचे दिसते. विकासाची क्षमता, कामाचा अनुभव, सामाजिक विश्वास आणि राजकीय समतोल यांचा विचार करत सिन्नरकरांनी सत्ता वाटपाचा कौल दिला आणि तोच या निवडणुकीचा खरा मतितार्थ ठरतो.

सहानुभूती आणि फटक्याची चर्चा

या निवडणुकीत माजी मंत्री अ‍ॅड. कोकाटे यांनी त्यांच्या विधानसभा निवडणुकीवेळी शहरातील काही प्रमुख विरोधी कार्यकर्त्यांनी दिलेल्या मदतीची परतफेड केल्याचेही दिसून आले. याचे ठळक उदाहरण म्हणजे प्रभाग क्रमांक 5 येथे शिवसेना ठाकरे गटाचे उदय गोळेसर यांच्या विरोधात उभे असलेले युगेंद्र क्षत्रिय यांनी थेट माघार घेतली. त्यानंतर शिंदे सेनेचे उमेदवार दर्शन भालेराव यांनीही माघार घेतल्याने गोळेसर यांचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. प्रभाग क्रमांक 14 आणि 10 मध्येही शिवसेना ठाकरे गटाच्या पंकज मोरे आणि सोमनाथ पावसे यांच्यासाठी कोकाटे ‘अस्त्र म्यान’ केल्याचे बोलले जाते. मात्र पावसे यांना विजय मिळविता आला नाही, ही त्यांच्या प्रयत्नांतील कसूर म्हणावी लागेल. या सगळ्या घडामोडींचा अप्रत्यक्ष फायदा नगराध्यक्ष पदाच्या लढतीत विठ्ठल उगले यांना झाल्याचे दिसते. पडद्याआडून दिलेल्या मदतीमुळे कोकाटे यांच्याबाबत काही भागात सहानुभूती निर्माण झाली आणि त्याचा फायदा उगले यांना, तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार प्रमोद चोथवे यांना फटका बसल्याची चर्चा आहे.

आमदार कोकाटे-खासदार वाजे यांची राजकीय प्रगल्भता?

गेल्या वर्षभरात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या निमित्त माजी मंत्री कोकाटे आणि खासदार वाजे यांच्यात मनोमिलन झाल्याची चर्चा होती. त्यामुळे नगर परिषद निवडणुकीत युती - आघाडी होईल, अशी अटकळ बांधली जात होती. राज्यात बहुतांश ठिकाणी असे प्रकार बघायला मिळाले. मात्र सिन्नरमध्ये प्रत्यक्षात तसे घडले नाही. यामागे दोन्ही नेत्यांची राजकीय प्रगल्भता दिसून येते. एकूण 30 जागांमध्ये युती केल्यास सर्व इच्छुकांना उमेदवारी देणे अशक्य झाले असते आणि नाराज कार्यकर्ते उमेदवार म्हणून आयतेच विरोधकांना मिळाले असते. ही शक्यता टाळण्यासाठी दोघांनीही स्वतंत्र लढत देत विरोधकांना सत्तेपासून दूर ठेवण्यात यश मिळविले, अशी चर्चा सिन्नरच्या राजकीय वर्तुळात आहे. मात्र ती कितपत खरी, हे सांगणे कठीण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news