Nashik Municipal Council Election Analysis : भाजपला छोबीपछाड देत शिंदे शिवसेना ठरली ‘धुरंधर’

11 पैकी तब्बल 5 नगरपरिषद शिंदे सेनेच्या ताब्यात
नाशिक
जिल्ह्यातील ११ नगपरिषदांची निवडणूक सत्ताधारी भाजपने प्रतिष्ठेची केली Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : विकास गामणे

जिल्ह्यातील ११ नगपरिषदांची निवडणूक सत्ताधारी भाजपने प्रतिष्ठेची केली खरी. मात्र, घटक पक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेनेच भाजपला छोबीपडाछ दिली आहे. ११ पैकी तब्बल ५ नगरपरिषद शिंदेसेनेने ताब्यात घेतल्या आहेत.

निवडणुकांच्या तोंडावर सिन्नर, चांदवड, इगतपुरीत भाजपने केलेले फोडाफोडीचे राजकारणाला मतदारांनी नाकारले आहे. यातून झालेल्या गटबाजीचाही फटका पक्षाला जिल्ह्यात बसला आहे. याउलट एकाकी पाडलेल्या शिंदेसेनेने सुनियोजीत रणनिती ठरवत मंत्री दादा भुसे व आमदार सुहास कांदे यांच्यात अधिकाराचे विकेंद्रीकरण करत पक्ष एकसंघ ठेवल्याने मोठा फायदा झाला. ग्रामीण भागात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असतानाही पक्षाला फारसे यश पदरी पडले नाही. या निवडणुकीत महाविकास आघाडी चाचपडत राहिली. त्यामुळे निकालातही उबाठा शिवसेना, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निकालात फारसे अस्तित्व दिसले नाही.

नाशिक
Nashik Shinde Sena Victory : नाशिक जिल्हा शिंदे शिवसेनेचा बालेकिल्ला

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पहिल्या टप्यात नगरपरिषदांच्या निवडणुकीत महायुती म्हणून रिंगणात उतरतील अशी अपेक्षा होती. परंतू, पक्ष फोडाफोडी, पदाधिकारी पळवापळवीमुळे भाजप, शिेंदे सेनेत तुटेपर्यंत फाटले. त्यामुळे जिल्ह्यात तिघेही पक्ष स्वतंत्र निवडणुकीत उतरल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाश शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या निवडणुकीत प्रतिष्ठा पणाला लागली होती. विधानसभेत सर्वाधिक जागा मिळवलेल्या भाजपने या निवडणुकांच्या तोंडावर फोडाफाेडी केली.

सिन्नरमध्ये माजी मंत्री माणिकराव कोकाटे यांचे बंधू भारत कोकाटे, उदय सांगळे, हेमंत वाजे, माजी आमदार शिरीष कोतवाल, अद्वय हिरे यांना पक्षात प्रवेश दिले.

इगतपुरीत उबाठा गटच पक्षात सामावून घेतले. संकटमोचक गिरीश महाजन यांच्या माध्यमातून हे पक्ष संघटन मजबुतीसाठी हे केले. परंतु, निवडणुकीत याचा उलटा परिणाम दिसून आला. सिन्नर, इगतपुरीत भाजपला नाकारले आहे.

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, त्र्यंबकेश्वर नगरपरिषद ताब्यात घेण्यासाठी संकटमोचक मंत्री महाजन उतरले. त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवाराला बसवले. मुख्यमंत्री फडणवीस यांचीही सभा घेतली. मात्र, पक्षाला फाजील आत्मविश्वास नडला. येथेही शिंदेसेनेने बाजी मारली.

चांदवडमध्ये माजी आमदार कोतवाल यांना प्रवेश दिला. यामुळे एकहाती सत्ता येईल, ही अपेक्षा मात्र फोल ठरली. खासदार राजाभाऊ वाजे यांचे सिन्नरमधील कुटुंब फोडत हेमंत वाजेंना

सिन्नरमधून भाजपने रिंगणात उतरवले. परंतु, मतदारांनी त्यांना थेट चौथ्या स्थानी फेकले. त्यामुळे भाजपचा उधळलेला वारू माजीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी काही अंशी रोखला. सिन्नर नगरपरिषद ताब्यात आल्याने अडचणीत सापडलेल्या कोकाटेंना काहीसा दिलासा मिळाला.

निफाडमधील नव्याने झालेल्या पिंपळगाव बसवंत व ओझर नगरपरिषदांच्या पहिल्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळवले. पिंपळगाव बसवंत येथे निवडणुकांच्या तोंडावर एकत्र आलेले राष्ट्रवादीचे आमदार दिलीप बनकर आणि भास्कर बनकर हे मतदारांच्या पचनी पडले नाही. येथे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार भास्कर भगरे यांचे मेव्हणे गोपाळकृष्ण गायकवाड यांनाही पराभव पत्करावा लागला.

ओझर नगरपरिषदेत भाजप जिल्हाध्यक्ष यतिन कदम यांनी आपला करिश्मा दाखवला. भगूर नगरपरिषदेत शिंदे सेनेची २५ वर्षांची सत्ता मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीने उलथून लावली. आमदार सरोज अहिरे यांनी आपले वर्चस्व दाखवून दिले.

येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत निवडणूक झाली. येथे शिंदेसेनेने आमदार किशोर दराडे व माजी आमदार नरेंद्र दराडे यांचे पुतणे रिंगणात उतरवले. परंतु, दराडे यांच्या सत्तेसाठी सततच्या बदलत्या भूमिकेला मतदारांनी नाकारले. विधानसभा निवडणूक डोळयासमोर ठेवत माजी खासदार समीर भुजबळांची रणनिती यशस्वी ठरली. भाजपने युतीला नाकारलेल्या शिंदे सेनेने मात्र, जिल्ह्यात सरस कामगिरी बजावली. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार कांदे व मंत्री भुसे यांच्या अधिकाराचे विकेंद्रीकरण करत त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी नेटाने पार पाडली.

नांदगाव व मनमाड नगरपरिषद कांदे यांच्या माध्यमातून एकहाती पक्षाच्या ताब्यात आल्या. मंत्री भुसे यांनी सटाणा नगपरिषदेत लक्ष घातल्याने त्यांचा फायदा झाला. त्र्यंबकेश्वर व इगतपुरीत भाजपची रणनिती शिंदेसेनेने उलथून लावली. दोन्ही ठिकाणी भाजप विरोधात असलेली नाराजी लक्षात घेत स्थानिकांना सोबत घेऊन शिंदेसेनेने बाजी मारली. निवडणूक लागल्यापासूनच महाविकास आघाडीत बिघाडी झाली होती.

उबाठा शिवसेना, काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसने नगरपरिषदांच्या निवडणुकीत सोईने युती, आघाड्या केल्या होत्या. येवल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीने शिंदे सेनेसोबत तर, भगूर येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत पक्ष गेला होता. नवे शिलेदार मिळालेल्या काँग्रेसने काही ठिकाणी स्वबळावर उतरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, पक्षाला फारसे यश मिळाले नाही. उबाठा शिवसेनेचे खासदार वाजे यांच्या माध्यमातून सिन्नरमध्ये काहीसे अस्तित्व दिसून आले इतकेच.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news