

नाशिक : नाशिकमध्ये ऐन निवडणुकीत काँग्रेसला भगदाड पडले आहे. काँग्रेस प्रदेश सचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर माजी नगरसेवक राहुल दिवे यांनी माजी नगरसेविका आशा तडवी व अपक्ष माजी नगरसेवक सुनील बोराडे यांच्यासह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला. यामुळे नाशिकमध्ये शिंदेसेनेला बळ प्राप्त झाले आहे.
दिवे हे काँग्रेसचे प्रदेश सचिव होते. गेली अनेक वर्षे काँग्रेसचे सक्रिय पदाधिकारी म्हणून ते कार्यरत होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र स्थानिक नेत्यांनी विरोध केल्यानंतर त्यांचा प्रवेश रोखला गेला. अखेर दिवे यांनी भाजप प्रवेशाचा विचार सोडत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. दिवे यांच्यासह त्यांच्या प्रभागातील काँग्रेसच्या अन्य माजी नगरसेविका आशा तडवी व माजी अपक्ष नगरसेवक सुनील बोराडे यांनी देखील शिंदेसेनेत प्रवेश केला.
बोराडे हे 2007मध्ये अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर मात्र त्यांना फारसे यश मिळाले नाही. प्रभाग क्रमांक 18 मध्ये पॅनल भक्कम करण्याच्या अनुषंगाने बोराडे यांचा प्रवेश झाला. प्रवेशावेळी उपनेते अजय बोरस्ते, विजय करंजकर, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आदी उपस्थित होते. नाशिक शहरामध्ये काँग्रेसची ताकद ठराविक प्रभागांमध्ये आहे त्यात प्रभाग क्रमांक 16 चा समावेश होतो. दिवे व तडवी यांच्या शिंदे सेनेत प्रवेश झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. चार दिवसांपूर्वी दिवे यांनी काँग्रेसकडून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. दरम्यान, दिवे यांच्या या प्रवेशामुळे महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसची ताकद घटल्याचे मानले जात आहे. काँग्रेसतर्फे 45 जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र आता दोन माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने काँग्रेसची वाताहत झाली आहे.
काँग्रेस पक्षात स्वातंत्र्य मिळत नव्हते. पक्षवाढीसाठी प्रयत्न केल्यानंतरही आडकाठी आणली जात होती. प्रभागाच्या विकासासाठी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रभागातील जनता आणि कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
राहुल दिवे, माजी नगरसेवक.