

सटाणा (नाशिक): सुरेश बच्छाव
येथील नगर परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या हर्षदा राहुल पाटील यांनी भाजपच्या योगिता सुनील मोरे यांना पराभवाची धूळ चारली. हर्षदा पाटील यांच्या रूपाने थेट नगराध्यक्ष पदासह चार नगरसेवक पदाच्या जागा जिंकून शिवसेनेने तालुक्याच्या राजकारणात दिमाखात प्रवेश केला. शिक्षणमंत्री दादा भुसे यांची रणनीती व स्थानिक कार्यकर्त्यांचे एकवटलेले बळ यामुळे तसेच भाजपमधील बंडखोरीमुळे हा विजय सुकर झाला.
भाजपला थेट नगराध्यक्षपद गमवावे लागले असले, तरी त्यांनी नगरसेवक पदाच्या 15 जागा जिंकून आघाडी मिळविली. राष्ट्रवादी काँग्रेसने एक जागा जिंकून खाते उघडले. चार जागांवर अपक्षांनी बाजी मारली. शिवसेना उद्धव ठाकरे व काँग्रेसला एकही जागा राखता आली नाही. नगर परिषदेचा हा निकाल तालुक्याच्या राजकारणाची आगामी दिशा आणि दशा बदलणारा ठरेल असे बोलले जात आहे. येथील मराठा हायस्कूलच्या देव मामलेदार यशवंतराव महाराज सभागृहात रविवारी (दि. 21) सकाळी 10 वाजता 12 टेबलांवर 12 ही प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरू झाली. थेट नगराध्यक्ष पदाच्या शिवसेनेच्या उमेदवार हर्षदा राहुल पाटील यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली. शेवटच्या फेरीअखेर त्यांना 10 हजार 307 मते मिळाली. भाजपच्या उमेदवार योगिता सुनील मोरे या 7 हजार 373 मते मिळवून दुसर्या क्रमांकावर, तर अपक्ष रूपाली परेश कोठावदे यांनी 5 हजार 741 मतांचा निर्णायक टप्पा गाठला. भाजपमधील ही उभी फूट शिवसेना उमेदवाराच्या पथ्यावर पडली. हर्षदा पाटील या 2 हजार 934 मताधिक्याने विजयी झाल्या. नगराध्यक्ष पदासाठी 96 जणांनी ‘नोटा’चा वापर केला.
नगरसेवक पदाच्या 24 जागांपैकी 2 जागांवर आधीच भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. मतदानातूनही नगरसेवक पदासाठी भाजपचे 13 उमेदवार विजयी झाले. शिवसेनेला नगरसेवक पदाच्या चार जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली. चार जागांवर अपक्षांनी बाजी मारली. मतदारांनी पक्षाबरोबरच व्यक्तीलाही पसंती दिल्याचे दिसून आले. निकालाबाबत घोषणा होताच विजयी उमेदवार व समर्थकांकडून गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. मतमोजणी केंद्राबाहेर ढोल - ताशाच्या गजरात जल्लोष करण्यात आला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
पाटील दाम्पत्याकडून मोरे दाम्पत्य चितपट
या निवडणुकीतील वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेच्या हर्षदा राहुल पाटील या मावळते नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या पत्नी भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार योगिता मोरे यांना टक्कर देत होत्या, तर त्यांचे पती राहुल पाटील माजी नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या विरुद्ध प्रभाग 5 मध्ये समोरासमोर लढत देत होते. पाटील दाम्पत्याने मोरे दाम्पत्याला चितपट केले. पाटील सरस ठरले. यामुळे भाजपची स्थिती गड आला पण सिंह गेला, अशी झाली. गत पाच वर्षे येथील नगर परिषदेचे राजकारण सुनील मोरे यांच्याभोवती फिरत होते. त्यांना पराभवाचे धनी व्हावे लागले.
शिवसेनेची दमदार एन्ट्री
भाजपचे विद्यमान आमदार दिलीप बोरसे यांनी भाजपसाठीची ही लढाई प्रतिष्ठेची केली असली, तरी शिवसेनेच्या माध्यमातून दादा भुसे प्रथमच तालुक्याच्या राजकारणात प्रत्यक्ष उतरले होते. विशेष म्हणजे शिवसेनेने मुहूर्तालाच दमदार कामगिरी केली असून, नगराध्यक्ष पदासह चार नगरसेवक पदांच्या जागांवर विजयश्री खेचून आणली. साहजिकच यामुळे नगरसेवक पदासाठी सर्वाधिक 15 जागा जिंकूनही भाजपला मात्र ‘गड आला पण सिंह गेला’ या म्हणीनुसार बॅकफूटवर जावे लागले. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने हा निकाल महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
शहरवासी परिवर्तनासाठी उत्सुक होते. शिवसेनेने शहरवासीयांसमोर सक्षम पर्याय दिला. तो स्वीकारत चांगल्या मताधिक्याने निवडून दिले. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वाखाली शहरवासीयांना दिलेला प्रत्येक शब्द सत्यात उतरवला जाईल.
हर्षदा राहुल पाटील, नवनिर्वाचित नगराध्यक्ष, सटाणा, नाशिक
भाजप बंडखोर पहिलवानाने मारला आखाडा
प्रभाग क्रमांक 6 ब मधून भाजपचे युवा मोर्चा पदाधिकारी पहिलवान मंगेश खैरनार यांची उमेदवारी कापून ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैभव गांगुर्डे यांना उमेदवारी देण्यात आली. खैरनार यांनी पक्षांतर न करता अपक्ष लढत दिली. विशेष म्हणजे कट्टर हिंदुत्ववादी चेहरा म्हणून ओळखल्या जाणार्या खैरनार यांना मतदारांनी तब्बल 1 हजार 21 एवढे मतदान केले, तर विरोधातील गांगुर्डे यांना केवळ 318 मते मिळाली. खैरनार हे सर्व नगरसेवकांमध्ये 703 एवढ्या सर्वाधिक मताधिक्याने विजयी झाले. प्रभाग क्रमांक 9 अ मध्ये भाजपचे विलास दंडगव्हाळ यांना 635 मते मिळाली, तर शिवसेनेचे दीपक नंदाळे यांना 624 मते मिळाली. नंदाळे यांचा अवघा 11 मतांनी निसटता पराभव झाला.
थेट नगराध्यक्ष उमेदवारांची मते
नगराध्यक्ष : हर्षदा राहुल पाटील, शिवसेना (10,307),
योगिता सुनील मोरे - भाजप 7,373,
रूपाली परेश कोठावदे - अपक्ष (5,741)
नगर परिषदेतील वॉर्डनिहाय विजयी व नजीकचा पराभूत उमेदवार
1/अ सुशीला दादाजी रौंदळ- शिवसेना (600) विजयी, सीमा पंकज सोनवणे- भाजप(946) पराभूत
1/ब सुमित विजयराज वाघ- भाजप (677) किरण अनिल (बापू) कडौवाल- शिवसेना (540)
2/अ जयश्री साहेबराव गरुड- शिवसेना (923) आशा रमेश भामरे- भाजप (434)
2/ब चेतन शिवाजी रौंदळ- भाजप (709) अनिल मोठाभाऊ सोनवणे- शिवसेना (405)
3/अ भूषण तानाजी सोनवणे- शिवसेना (1,219) शिवाजी प्रभाकर सोनवणे- भाजप (632)
3/ब संगीता देवेंद्र सोनवणे-भाजप (बिनविरोध)
4/अ तनुजा किरण नांद्रे- शिवसेना (1,,017) संगीता नंदकिशोर सोनवणे- भाजप (824)
4/ब महेश नानाभाऊ सोनवणे- भाजप (1,270) आरिफ (मुन्ना) कासीम शेख- शिवसेना (845)
5/अ सोनाली दत्तू बेताडे- भाजप (887) विद्या उदय सोनवणे- शिवसेना (625)
5/ब राहुल सुभाष पाटील- शिवसेना (1,075) सुनील दोधा मोरे- भाजप (521)
6/अ अलका लखन बोरसे- अपक्ष (697) वैशाली दिलीप निकम- शिवसेना (427)
6/ब मंगेश विजय खैरनार- अपक्ष (1,021) वैभव भगवान गांगुर्डे- भाजप (318)
7/अ प्रतिभा संदीप खैरनार- भाजप (1,123) भारती सुभाष सूर्यवंशी- अपक्ष (1,030)
7/ब चेतन अशोक मोरे- भाजप (1,047) सागर अमृत पगार- शिवसेना (688)
8/अ कल्पना दयाराम सोनवणे- अपक्ष (853) प्रतिभा विठ्ठल येवलकर- राष्ट्रवादी (575)
8/ब हर्षवर्धन संजय सोनवणे- भाजप (1102) अॅड. यशवंत हिरामण पाटील- राष्ट्रवादी (559)
9/अ विलास भालचंद्र दंडगव्हाळ- भाजप (635) दीपक हिरामण नंदाळे- शिवसेना (624)
9/ब मनीषा दीपक पाकळे- भाजप (741) योगिता नीलेश पाकळे- अपक्ष (592)
10/अ लताबाई पोपट बच्छाव- भाजप (1218) सुरेखा प्रकाश बच्छाव- राष्ट्रवादी (963)
10/ब मुल्ला रऊफ खलील शहा- भाजप (946) मनोज अण्णा सोनवणे- राष्ट्रवादी (757)
11 अ नितीन दगाजी सोनवणे- भाजप (बिनविरोध)
11/ब अॅड. हुमेरा यासिर शेख- राष्ट्रवादी (826) वंदना मधुकर सोनवणे- शिवसेना (725)
12/अ अॅड. मनीषा जयवंत पवार- अपक्ष (1198) अनिता विलास सोनवणे- शिवसेना (817)
12/ब अनिता विलास सोनवणे शिवसेना (817) सुनंदा रमेश देवरेभाजप (545)