

देवळाली कॅम्प (नाशिक) : सुधाकर गोडसे
स्वातंत्र्यवीर वी. दा. सावरकरांची जन्मभूमी व नाशिक तालुक्यातील एकमेव नगर परिषदेत असलेल्या भगूरमध्ये शिवसेना शिंदे गटाची 25 वर्षाची सत्ता उलथावून टाकतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, भाजप, उबाठा गटाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. 20 पैकी 11 जागा आघाडीने, 8 जागा शिवसेनेने तर एक जागा अपक्ष वंचित बहुजन आघाडीने जिंकली आहे.
नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे (5407) यांनी बाजी मारत शिंदे सेनेच्या अनिता करंजकर (3494) यांचा 1913 मताने पराभव केला. यामुळे ज्येष्ठ नेते विजय करंजकरांना जोरदार धक्का बसला आहे. आमदार सरोज अहिरे यांनी प्रतिष्ठा पणाला लावत बोलून नाहीतर करून दाखविल्याची भावना यावेळी उमटली.
भगूर नगर परिषद निवडणुकीत आ. अहिरे विरुद्ध शिवसेना शिंदे गट उपनेते विजय करंजकर अशी रंगली होती. या ठिकाणी 73 टक्के मतदान झाले होते. शनिवारी (दि.२१) विहितगाव येथील मतमोजणी केंद्रावर सकाळी आघाडीचे उमेदवार व समर्थक मोठ्या आत्मविश्वासाने उपस्थित होते तर शिंदे सेनेचे प्रमुख पदाधिकारी वगळता इतर कोणी उपस्थित नव्हते. पहिल्या पाच प्रभागात शिंदे सेनेचे 6, आघाडीच 4 नगरसेवक विजयी झाले. प्रभाग सहा ते दहामध्ये आघाडीचे 7 तर शिंदे सेनेचे 2 व अपक्ष 1 असे उमेदवार विजयी झाले.
नगराध्यक्षपदी बलकवडे यांची बाजी
थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाच्या प्रेरणा विशाल बलकवडे यांनी 5407 मते घेतली तर शिंदे सेनेच्या माजी नगराध्यक्ष अनिता विजय करंजकर यांना 3494 मते मिळाली 1913 मध्ये जास्तीचे मत घेत बलकवडे या विजयी झाल्या.
प्रभाग एकमध्ये शिंदे सेनेचे सागर चंद्रमोरे 720 यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे केतन सोनवणे 365 यांचा ४५५ मतांनी पराभव केला तर याच प्रभागात महिला गटात शिंदे सेनेच्या कांता शाम गायकवाड 624 यांनी भाजपच्या शीतल सचिन शेटे 262 व उभाटाच्या सानिया शेख 207 यांचा 362 मतांनी पराभव केला.
प्रभाग दोनमध्ये शिंदे गटाच्या कापसाबाई साळवे 530 यांनी राष्ट्रवादीच्या सीमा सोनवणे 236 यांचा 294 मतांनी पराभव केला. याच प्रभागात शिंदे सेनेचे शंकर करंजकर 520 यांनी राष्ट्रवादीचे धीरज गायकवाड 245 यांचा 275 मतांनी पराभव केला.
प्रभाग तीनमध्ये उबाठाच्या जयश्री देशमुख 668 यांनी शिवसेनेच्या नीलिमा राजेश कुलथे 470 यांचा मतांनी पराभव केला. याच प्रभागातील भाजपचे प्रसाद अंबादास आडके 707 यांनी शिवसेनेचे संजय माधव जाधव 433 यांचा 274 मतांनी पराभव केला.
प्रभाग चारमध्ये भाजपच्या सुजाता शिरसाट 489 यांनी शिवसेनेच्या प्रतिभा घुमरे 277 यांचा 212 मतांनी पराभव केला. याच प्रभागात उबाठाचे काकासाहेब देशमुख 325 यांनी शिवसेनेचे शिंदे गटाचे निमेश द्वारकानाथ झंवर 296 यांचा 29 मताने पराभव केला.
प्रभाग पाचमध्ये शिंदे सेनेच्या सुदेश माधव वालझाडे 334 यांनी अपक्ष शुभम राजेंद्र बागडे 252 व उभा टाचे श्याम रवींद्र देशमुख 199 यांचा 82 मताने पराभव केला. याच प्रभागात शिवसेनेच्या सुचित्रा भुरके 303 यांनी अपक्ष प्राजक्ता बागडे 266 व उभाटाच्या अनिता चव्हाण 208 यांचा 37 मतांनी पराभव केला.
प्रभाग सहामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाच्या मनीषा कस्तुरे 449 यांनी अपक्ष पूजा बागडे 336 व भाजपच्या शोभा भागवत ३१६ यांचा 113 मतांनी पराभव केला.
प्रभाग सहामध्ये भाजपचे दीपक बलकवडे 697 यांनी शिवसेनेचे दत्तात्रय देविदास कुवर 401 यांचा 296 मतांनी पराभव केला.
प्रभाग सातमध्ये भाजपचे अमोल इंदरखे 359 यांनी शिवसेनेचे पंकज कापसे 326 व उबाठाचे सुभाष जाधव 104 यांचा 33 मतांनी पराभव केला. याच प्रभागातील भाजपच्या विद्या बलकवडे 498 यांनी शिवसेनेच्या कल्पना सुनील गोरे 285 यांचा 213 मतांनी पराभव केला.
प्रभाग आठमध्ये भाजपचे बबलू जाधव 594 यांनी शिवसेनेचे संजय पवार 262 यांचा 332 मतांनी पराभव केला. तर राष्ट्रवादीच्या लता थापेकर 582 यांनी शिवसेनेच्या प्रतिमा शिदगुडे 210 यांचा 372 मतांनी पराभव केला.
प्रभाग नऊमध्ये राष्ट्रवादीच्या अश्विनी भवार 554 यांनी शिवसेनेच्या स्वाती शरद झुटे 277 यांचा 277 मतांनी पराभव केला. या प्रभागात राष्ट्रवादीचे विशाल गोरखनाथ बलकवडे 570 यांनी शिवसेनेचे कैलास महादूभोर 220 यांचा 350 मतांनी पराभव केला.
प्रभाग 10 मध्ये वंचित आघाडीचे अजय हरिचंद्र वाहने 296 यांनी शिवसेनेचे शरद शंकर उबाळे 217 व राष्ट्रवादीच्या भारती अनिल साळवे 212 यांचा 79 मताने पराभव केला. तर शिवसेनेच्या सोनाली सोनवणे 453 यांनी राष्ट्रवादीच्या स्वीटी साळवे 257 यांचा 196 मतांनी पराभव केला.
निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार पंकज पवार, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिनकुमार पटेल यांनी अवघ्या अर्ध्या तासात संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांना विजयाचे पत्र प्रदान केले.
विजयानंतर समर्थकांचा जल्लोष
निकाल बाहेर होती येताच आघाडीच्या समर्थकांकडून जल्लोष सुरू करण्यात आला. पोलिसांनी मिरवणुकीस बंदी घालण्याच्या नोटिसा अगोदरच दिल्याने उमेदवारांना केवळ जल्लोष करत नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे, आमदार सरोज आहिरे, भाजपचे माजी शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह उबाठाचे काकासाहेब देशमुख यांनी विजयी जल्लोष केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष निवृत्ती अरिंगळे, मनोहर कोरडे, विक्रम कोठुळे, सोमनाथ बोराडे, बाळासाहेब मस्के, विलास धुर्जड, सोनू रामवाणी, सायरा शेख आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
यंदा तीन दाम्पत्य सभागृहात
यंदाच्या निवडणुकीत विशाल बलकवडे हे नगरसेवक तर त्यांच्या पत्नी प्रेरणा बलकवडे या नगराध्यक्ष पदासाठी विजयी झाल्या. याशिवाय भाजपचे दीपक बलकवडे व विद्या बलकवडे, उबाठाचे काका देशमुख व जयश्री देशमुख हे पती- पत्नी देखील विजयी झाले.
भाजपला मोठे यश
भाजपने आघाडीच्या माध्यमातून 8 जागा लढवल्या व त्यांचे 6 उमेदवार विजयी झाले. शिवसेना शिंदे गटाने 20 जागा लढवल्या त्यात 8 उमेदवार विजयी झाले, उभाटाने 5 जागा लढविल्या 2 विजयी झाले तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने 7 जागा लढविल्या 3 विजयी झाले.
काकांनी राखली उभाठाची लाज
शिवसेना उबाठाचे शहर प्रमुख व माजी उपनगराध्यक्ष काकासाहेब देशमुख यांनी स्वतःसह पत्नीलाही विजयी केले व उबाठाला दोन नगरसेवक मिळाले. या पती-पत्नीच्या या विजयामुळे उभाठाची लाज राखली गेली.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जन्मभूमीत विकास करण्यासाठी कटीबद्ध आहे. निवडणूक काळात दिलेला शब्द पूर्ण करणार आहोत. निवडणूक संपली कटुता देखील संपली. आता विकास हेच ध्येय राहिल. लवकरच सावरकर उद्यान व आरोग्य केंद्राचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत केले जाईल.
आमदार सरोज अहिरे, देवळाली कॅम्प, नाशिक
निवडणुक केंद्रस्थानी राहिला ‘बाप’
निवडणुकीत शिवसेनेकडून आ. अहिरे यांचा बाप काढण्यात आला व प्रचाराला आलेल्या हेलिकॉप्टरने कचऱ्याचा उडवलेला धुराळा हे दोन्ही मुद्दे राष्ट्रवादीकडून जोरदारपणे सोशल मीडियात फिरवण्यात आले त्याचा जबरदस्त परिणाम मतदानाच्या दिवशी दिसून आला व त्याची प्रचिती निवडणूक निकालातूनही दिसून आली जनतेला गृहीत धरणे हे शिवसेना शिंदे गटाला महाग पडले
वीस वर्षे विकासाचे राजकारण केले. गावाने भरभरून साथ दिली. एखाद्या निवडणुकीत गावाने वेगळा निर्णय घेतल्यास तो देखील मान्य केला पाहिजे. पुन्हा नव्या जोमाने जनसेवेला लागू व जनतेचा विश्वास प्राप्त करू.
विजय करंजकर उपनेते, शिवसेना शिंदे गट