

नाशिक : सोयीपेक्षा गैरसोयीसाठीच अधिक चर्चिल्या जात असलेल्या नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालयात गेल्या सहा वर्षांपासून रेडिओलॉजिस्ट नसल्याने सोनोग्राफी विभाग बंद अवस्थेत आहे. याशिवाय कोविड काळात रुग्णालयात असलेले १७ व्हेंटीलेटर अचानक गायब केल्याने, आयसीयू विभागाला व्हेंटीलेटरच नाही. अत्यावस्थ रुग्णाला मरणाच्या दारात सोडण्याचा हा प्रकार असून, रुग्णालयात तत्काळ अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, या मागणीचे निवेदन माजी नगरसेवक जगदीश पवार यांनी आरोग्य अधिकारी विजय देवकर यांना दिले.
निवेदनात म्हटले की, रुग्णालयात औषधांचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे गोरगरिब रुग्णांना आर्थिक झळ सोसत बाहेरून औषधे खरेदी करावे लागत आहेत. रुग्णालयात एमआरआय, सीटीस्कॅन, लॅबचे दर महागडे असल्याने हा दवाखाना नक्की गोरगरिबांसाठीच आहे काय? असा प्रश्न उपस्थित होतो. डोळे तपासणीची मशीन ओपीडीमध्ये धुळखात पडून आहेत. त्यामुळे नेत्ररोग विभागाचा रुग्णांना काहीही फायदा होत नाही.
रुग्णालयातील स्टेशनरी संपलेली असल्याने, त्याचाही फटका रुग्णांना सहन करावा लागत आहे. कमी मनुष्यबळ असल्याने रुग्णसेवेलाही मर्यादा येत आहेत. मानधनावरील डॉक्टरांना अनियमित वेतन दिले जात आहे. लिफ्टमन अभावी रुग्णालयातील तिन्ही लिफ्ट बंद अवस्थेत आहेत. दिव्यांग रुग्णांना व्हिलचेअर नसल्याने, त्याना मोठा त्रास सोसावा लागत आहे. कॅन्युलिटी वार्डाचा भार एक-दोन कर्मचाऱ्यांवर सोपविला जात असल्याने, त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न आहे. रुग्णालयात वेळीअवेळी वीज गायब होत असल्याने, रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. या सर्व समस्यांबाबत रुग्णालयाच्या वरिष्ठांना वारंवार सूचित करून देखील काहीच कारवाई होत नसल्याने, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जावी, अशी मागणी पवार यांनी केले. तसेच रुग्णालयात वेळीच सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून न दिल्यास, तीव्र जनआंदोलन छेडणार असल्याचा इशाराही पवार यांनी निवेदनाद्वारे दिला.
---
रुग्णालय अस्वच्छतेचे आगार
रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न वर्षानुवर्षापासून कायम आहे. रुग्णांच्या बिछान्यावरील बेडशीट व चादर नातेवाईकांना घरून आणावी लागतात. तसेच काॅन्ट्रॅक्टर बेडशीट व चादरी लवकर आणून देत नसल्याने, रुग्णांची मोठी गैरसोय होते. याशिवाय रुग्णालयात शौचालयांची दुरावस्था झाली असून, अनेक शौचालयांचे दरवाजे तुटलेले आहेत. कमालीच्या अस्वच्छतेमुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना अस्वच्छतेत वावरावे लागत असल्याचे चित्र आहे.