

नाशिक : महापालिकेचे नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय आता सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर कात टाकणार आहे. कारण या ठिकाणी नवजात शिशु अतिदक्षता विभाग आणि अत्याधुनिक असे ऑपरेशन थिएटर सुरू होणार आहे. अतिदक्षता विभागात २५ सुसज्ज बेड, तर ऑपरेशन थिएटरमध्ये मणके तसेच हाडांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया होणार आहेत. यामुळे शहरातील गरजू आणि सर्वसामान्य रुग्णांना मोठा आर्थिक हातभार लागणार आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (नि.) डॉ. माधुरी कानिटकर व नाशिक महापालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांनी ठाकरे रुग्णालयाला गुरुवारी (दि. १४) संयुक्त भेट दिली. ठाकरे रुग्णालयात आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असून, त्यासंदर्भातील सुरू असलेल्या कामकाजाचीही माहिती घेण्यात आली. याबाबत प्राथमिक पाहणी व चर्चा करण्यात आली.
प्रस्ताव प्रत्यक्षात आल्यानंतर नाशिककरांना अधिक व्यापक व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध होणार आहे. भेटीदरम्यान रुग्णालयातील सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. नव्याने उभारण्यात येत असलेल्या नवजात शिशु अतिदक्षता विभाग तसेच अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरची पाहणी करण्यात आली. सध्या रुग्णालयात नवजात शिशु दक्षता विभागात सात बेड आहेत. त्यात वाढ करून २५ बेड करण्यात आले असून, येत्या 15 दिवसांत हा विभाग पूर्णपणे कार्यरत होईल. या सुविधा सुरू झाल्यानंतर बालरोग उपचार क्षमतेत आणि शस्त्रक्रिया सेवांमध्ये वाढ होणार आहे. अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरमध्ये अवघडातील अवघड मणक्यांची तसेच हाडांच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियादेखील करणे सहज सोपे होणार आहे.
याप्रसंगी नाशिक महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय देवकर, डॉ. जितेंद्र धनेश्वर, डॉ. शिल्पा काळे, डॉ. प्रशांत शेटे तसेच विज्ञान विद्यापीठाच्या पदव्युत्तर कॉलेजच्या डॉ. मृणाल पाटील, डॉ. गोपाल शिंदे, डॉ. सुहास पाटील व डॉ. कल्पना संकले उपस्थित होते.
नवजात शिशु अतिदक्षता विभागाचे कामकाज १५ दिवसांत सुरू होईल. तसेच रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर अत्याधुनिक करण्यात आले असून, याठिकाणी गुडघे, मणके तसेच इतरही सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया करता येणार आहे.
डॉ. विजय देवकर, मुख्य आरोग्य अधिकारी, नाशिक महापालिका.