

नाशिक रोड : बिटको रुग्णालयात दुपारच्या वेळेला तब्बल एक तास वीजपुरवठा खंडित झाल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
वीज नसल्यामुळे रुग्णालयातील अंधारात लहान बालकांपासून वृद्ध रुग्णांपर्यंत सर्वांनाच हालअपेष्टा सहन करावी लागली. तिसऱ्या मजल्यावर जाणारी लिफ्टदेखील बंद पडली. रुग्णालयातील जनरेटरदेखील बिघडलेले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
रुग्णालयातील अतिदक्षता विभागाचीही वीज खंडित झाली होती. मोबाइलच्या प्रकाशात परिचारिकांना रुग्ण व लहान बालकांना इंजेक्शन द्यावे लागले. त्यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महापालिकेने सिंहस्थासाठी या रुग्णालयाचा विचार करून नागरिकांना चांगली सेवा देण्याचे ठरवले असेल, तर हे रुग्णालय कितपत रुग्णसेवा देऊ शकेल? असा प्रश्न निर्माण होत आहे. प्रत्यक्षात रुग्णालयाचा भोंगळ कारभार वीज खंडित झाल्यावर स्पष्टपणे समोर आला. “महापालिकेची ही सोय नागरिकांचा जीव घेईल,” अशी संतप्त प्रतिक्रिया रुग्णालयातील रुग्णांनी व्यक्त केली.
इथे वीजपुरवठा खंडित होणे ही काही नवीन बाब नाही. अनेक संघटनांनी त्यांच्या वतीने जनआंदोलने केली पण प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नाही.
भारत निकम, रिपाइं नाशिक जिल्हा उपाध्यक्ष