

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालयात सध्या सुमारे दोनशेहून अधिक रुग्ण उपचार घेत असून, गेल्या दहा दिवसांपासून पाणीपुरवठा खंडित झाला आहे. त्यातच दोन दिवसांच्या पाण्याच्या शटडाउनमुळे पिण्याच्या पाण्यासाठी रुग्णांना वणवण करावी लागली.
शटडाउनची माहिती असतानाही कुठल्याही प्रकारची उपाययोजना न केल्याने आजारापेक्षा पिण्याच्या पाण्यासाठी रुग्ण त्रस्त होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे, अग्निशमन दल विभागाचे पाणी चक्क रुग्णालयासाठी वापरले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.
नाशिकरोड परिसरातील तसेच पंचक्रोशीतील ग्रामीण भागातील रुग्णांसाठी आधारस्तंभ ठरलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (बिटको) रुग्णालयात मूलभूत सुविधांसह पाणी नसल्याने बोजवारा उडाला आहे.
भव्य इमारत उभारूनही पाणीपुरवठ्यासारखी अत्यावश्यक सेवा ठप्प झाल्याने प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुरुवातीला दररोज टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात होता; परंतु शहरातील दोन दिवसांच्या पाणी बंद निर्णयामुळे टैंकर सेवादेखील ठप्प झाली. परिणामी, रुग्णालयात पाण्याचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांदरम्यान शहरात सुरू असलेल्या खोदकामामुळे अनेक जलवाहिन्या फुटण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे रुग्णालयाचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, त्याचा थेट फटका रुग्णांसह नातेवाइकांना बसत आहे. जीवनावश्यक सेवांनाही प्राधान्य दिले जात नाही का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सुविधांपेक्षा गैरसोयींचाच भडिमार
सुमारे अडीच लाख चौ. फूट क्षेत्रफळाच्या या रुग्णालयात सुविधांपेक्षा गैरसोयींचाच अधिक भडिमार असल्याची तक्रार आहे. ३५ रुग्णांच्या वॉर्डमध्ये केवळ दोनच स्नानगृहे असून, त्यातही रुग्णालयात पाणी नाही. त्यामुळे महिला रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या उदासीनतेवर टीका होत आहे.
महापालिका प्रशासनाचा अत्यंत बेजबाबदारपणा यानिमित्त पुढे येत आहे. गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयात पाणीबाणी आहे. मात्र, अशातही पाणीपुरवठा सुरळीत केला न जाणे दुर्दैवी आहे. सुरुवातीला टँकरने पाणीपुरवठा केला जात होता, आता तोही बंद झाला आहे. त्यामुळे दोनशेपेक्षा अधिक रुग्ण आजारापेक्षा पिण्याच्या पाण्यासाठीच त्रासल्याचे चित्र आहे. महापौर, उपमहापौर, महापालिका आयुक्तांनी संबंधितांवर कारवाई करावी.
- जगदीश पवार, माजी नगरसेवक