

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
मुख्य जलवाहिनी दुरुस्तीमुळे नाशिक शहरात ४८ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आल्यामुळे संपूर्ण शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली. विशेषतः चाकरमान्यांना रविवारी (दि. ५) पाण्यासाठी अक्षरशः वणवण फिरावे लागल्याने रविवारच्या सुटीवर पाणी फेरल्याची भावना व्यक्त होत होती.
तर घरगुती कामकाज ठप्प झाल्यामुळे महिलांचे हाल झाले. शनिवारी (दि. ४) साठविलेले पाणी रविवारी सकाळीच संपले. इमारतींच्या टाक्या कोरड्या पडल्या, तर बोअरवेलही उन्हाळ्यामुळे आटलेल्या स्थितीत असल्याने पर्याय संपले. परिणामी, नागरिकांना टँकर, जार व बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागले.
शहरात ६०० ते १,००० लिटर क्षमतेचे २०० हुन अधिक टँकरने पाणीपुरवठा झाला, तर सुमारे ८ ते ९ हजार पाण्याच्या जारचे वितरण करण्यात आले, तरीही मागणीच्या तुलनेत पुरवठा अपुरा ठरला. अचानक वाढलेल्या मागणीमुळे टँकर भरण्यास विलंब झाला, तर काही ठिकाणी पाण्याच्या जारच्या किमतीत २० ते ३० रुपयांनी वाढ झाल्याचेही दिसले.
बोअरवेल नसलेल्या सोसायट्यांमध्ये परिस्थिती अधिकच बिकट झाली. या सर्व परिस्थितीत महिलांचे सर्वाधिक हाल झाले. घरातील पाण्याअभावी स्वयंपाक, स्वच्छता आदी कामे रखडली. त्यामुळे महापालिकेच्या नियोजनावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. नाशिकरोड, सातपूर, सिडको, इंदिरानगर, गंगापूर, पंचवटी आदी परिसरांत रात्री उशिरापर्यंत टँकरने पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात आला, तरी अनेक भागांत टंचाई कायम राहिली.
महापालिकेकडून आगाऊ सूचना
मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्ती, जोडणीसाठी महापालिकेने शनिवारी (४ एप्रिल) आणि रविवारी (५ एप्रिल) असे दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत पूर्वसूचना दिली होती, तरी प्रत्यक्षात शहरातील बहुतांश भागांत पाण्याचा साठविलेला साठा अपुरा पडल्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले.
टाक्या कोरड्या, साठा संपला
महापालिकेने शटडाउनपूर्वी शुक्रवारी (दि. ३) पाणी सोडले असले, तरी शहरातील टाक्यांमधील साठा संपला. शनिवारीच पाणी संपले. रविवारी पिण्यासाठीही पाणी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना टँकर, बाटलीबंद पाण्यावर अवलंबून राहावे लागले. एवढेच नव्हे, तर अंघोळीसाठी नागरिकांना जारच्या पाण्याचा वापर करावा लागला.
मनपाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
दोन दिवसांचा शटडाउन जाहीर करताना पाण्याचे योग्य नियोजन झाले नसल्याची टीका होत आहे. शुक्रवारी पाणी सोडल्यानंतर रात्री मनपाचे मोठे जलकुंभ पूर्ण भरून ठेवले असते, तर शनिवारी, रविवारी पाणीपुरवठा सुरू राहिला असता, परंतु मनपा प्रशासनाने याबाबत विचार केला नाही, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली.
फोनने नगरसेवक बेजार
कृत्रिम पाणीटंचाईमुळे नागरिकांनी नगरसेवकांना सतत फोन केल्यामुळे त्यांचा पूर्ण दिवस पाण्याबाबत उत्तरे देण्यातच गेला. काही ठिकाणी नगरसेवक संपर्काबाहेर झाल्याच्या तक्रारीही पुढे आल्या.