

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा
मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ३०,५७३ रेकद्वारे ७९.३४ दशलक्ष टन मालवाहतूक करत त्यातून ८, २७९ कोटी रुपयांचा मालवाहतूक महसूल प्राप्त केला आहे. लोहखनिजाच्या १,०२२ रेक आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या २,६७२ रेकची लोडिंग नोंदवत, रेल्वेने आतापर्यंतची सर्वोत्तम मालवाहतूक आकडेवारी गाठली आहे.
मध्य रेल्वेच्या एकूण मालवाहतुकीमध्ये नागपूर विभागाचा ५४ टक्के इतका महत्त्वपूर्ण वाटा आहे. मध्य रेल्वेच्या कार्यक्षम सेवेमुळे कांद्याची वेळेवर वाहतूक होऊन साठवण नुकसान कमी होते व बाजारभाव स्थिर राहण्यास मदत झाली आहे.
अन्नधान्याचे मोठ्या प्रमाणावर वितरण सुलभ झाले आहे. मागील वर्षी कांद्याचे ९१ रेक वाहतूक केली होती. यंदा कांद्याचे २१२ रेक वाहतूक केली असून, रेकमध्ये १३३ टक्के वाढ झाली आहे.
मध्य रेल्वेच्या पाचही विभागांपैकी नागपूर विभागाने सर्वाधिक ५४ टक्के योगदान देत ४२.७२ दशलक्ष टन लोडिंग आणि ४५९७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून, हे एकूण उत्पन्नाच्या ५५ टक्के आहे. वस्तूनिहाय पाहता, कोळसा लोडिंग ३३.९२ दशलक्ष टन इतके असून, एकूण लोडिंगमध्ये ४५ टक्के वाटा आहे.
यामधून ३२१९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, ते एकूण उत्पन्नाच्या ३९ टक्के आहे. मध्य रेल्वेने दीर्घ पल्ल्याच्या ३१२ मालगाड्यांमध्ये १०० टक्क्यांपेक्षा अधिक वाढ करत आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील गाड्यांवरून आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये ७१९ गाड्यांपर्यंत वाढ केली आहे. दररोज सरासरी ३५९ मालगाड्यांची देवाणघेवाण झाली आहे.