

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयातील भोंगळ कारभार आणि अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेचे गंभीर चित्र बुधवारी रात्री समोर आले. उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णावर थेट कोयत्याने हल्ला करण्यात आला, तर त्याला वाचवण्यासाठी धावलेल्या कर्मचाऱ्यावरही हल्लेखोरांनी मारहाण केली.
या प्रकारामुळे रुग्णालय निष्काळजीपणावर उपस्थित झाले आहे. प्रशासनाच्या प्रश्नचिन्ह बुधवारी (दि. ८) रात्री साडेनऊच्या सुमारास आपत्कालीन विभागात ही धक्कादायक घटना घडली. राम निवृत्ती शिंदे (वय ५७) हे नाइट ड्यूटीवर असताना संदीप चटोले, सनी चटोले आणि नाजिम या तिघांनी रुग्णाला भेटण्याच्या बहाण्याने विभागात प्रवेश केला.
त्यांपैकी एकाने लपवून आणलेला कोयता बाहेर काढत उपचार घेत असलेल्या दीपक अमीर गांगुर्डे (रा. रोकडोबावाडी, देवळाली गाव) याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. यावेळी उपस्थित परिचारिका कावेरी नेहे, तसेच इतर रुग्णांनी आरडाओरड केल्यानंतर शिंदे यांनी तत्काळ धाव घेत हल्लेखोराचा कोयता हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, इतर दोघांनी त्यांना धक्काबुक्की करत मारहाण केली.
सिस्टर व सुरक्षारक्षकांच्या मदतीने दोन हल्लेखोरांना पकडण्यात आले; मात्र धमकी देत तिघेही तेथून पसार झाले. दरम्यान, जखमी गांगुर्डे याच्यावर यापूर्वीच जुन्या वादातून हल्ला झाला होता. त्याच दिवशी सायंकाळी झालेल्या मारहाणीत तो जखमी होऊन बिटको रुग्णालयात दाखल झाला होता.
रात्री पुन्हा झालेल्या हल्ल्यात त्याच्या पाठीवर गंभीर जखमा होऊन सुमारे १६ टाके पडले आहेत. या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेचा पूर्णतः अभाव उघड झाला आहे. २४ तास डॉक्टर, कर्मचारी, पुरेसे सुरक्षारक्षक आणि कार्यक्षम सीसीटीव्ही व्यवस्था नसल्याने अशा घटना घडत असल्याची कबुली सहायक वैद्यकीय अधीक्षक डॉ. कांचन लोकवाणी यांनी दिली.
याप्रकरणी राम शिंदे यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात संदीप चटोले, सनी चटोले व नाजिम यांच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, मारहाण व हल्ल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.