

येवला (नाशिक) : तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या चिंब पावसामुळे खरीप हंगामाला संजीवनी मिळाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे सोयाबीन, आद्रक, मका, बाजरी, तूर, मूग यांसारख्या पिकांना आवश्यक ती ओल मिळाल्याने माना टाकलेली व कोमेजलेली पिके पुन्हा तरारली आहेत.
यंदा पावसाची अनियमितता आणि खंडामुळे खरीप हंगाम धोक्यात येईल, अशी भीती होती. जुलै महिन्यात फक्त ८४ मिलिमीटर पाऊस पडला तर ऑगस्टच्या १४ तारखेपर्यंत फक्त १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे पिकांना ताण बसला होता. मात्र १५ ऑगस्टनंतर पावसाने हजेरी लावताच शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. १६ ऑगस्टला २४ मिलिमीटर आणि १७ ऑगस्टला १० मिलिमीटर पाऊस पडला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून संततधार सुरू राहिल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली असून पिकं तजेलदार झाली आहेत.
शासकीय आकडेवारीनुसार तालुक्यातील पावसाचे प्रमाण सरासरी इतके टिकून आहे. मात्र अवर्षणग्रस्त पूर्व भागात अद्याप बंधारे व जलस्रोतांमध्ये पुरेशी पाण्याची भर पडलेली नाही. त्यामुळे नदी, नाले, बंधारे कोरडेच आहेत. याउलट पश्चिम भागात पावसाचे प्रमाण समाधानकारक असून पालखेड डाव्या कालव्याला सोडलेल्या पाण्यामुळे तेथील बंधारे, नाले आणि नद्या तुडुंब भरून वाहत आहेत. एकूणच, उत्तर-पूर्व भागातील पावसामुळे खरीप हंगामातील संकट काही प्रमाणात टळले असून पिके सशक्त बनू लागल्याने शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला आहे.
तालुक्याची जून ते डिसेंबरपर्यंतची पर्जन्याची वार्षिक सरासरी ५४४ मिलिमीटर आहे. तालुक्यात आत्तापर्यंत ३२० मिलिमीटर पाऊस पडला असून वार्षिक सरासरीच्या ५८ टक्के इतका पाऊस आहे. जूनपासून आजपर्यंतची वार्षिक सरासरी २९० मिलिमीटर असून ११० टक्के पावसाची नोंद झाली आहे. एकूणच पावसाचे प्रमाण चांगले आहे पण भविष्याचा विचार करता अजून नदी नाल्यांसाठी पुरेशा पावसाची गरजही आहे.
आमच्या भागात कोणत्याच पाटपाण्याची सोय नाही, त्यामुळे पावसावरच येथील शेती अवलंबून आहे. आता पाऊस आल्याने खळगी भरल्या आहेत आणि ओढ्या-नाल्यातून पाणी खळखळून वाहू लागले आहे. त्यामुळे आनंद आहे. लाल कांद्याच्या रोपाचे थोडे नुकसान होत आहे, पण अजूनही नियमित पाऊस आला तर रब्बी हंगाम चांगला जाईल, असे मत भागवतराव सोनवणे यांनी व्यक्त केले.