नाशिक : श्रावणाच्या पहिल्या दिवशी शहर परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी (दि. २६) देखील दिवसभर रिमझिम सरींनी नाशिककरांचे जनजीवन विस्कळीत झाले.
मागील दहा दिवसांच्या विश्रांतीनंतर श्रावणाच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी (दि.२५) पहाटेपासूनच नाशिकसह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. हवामान विभागाने पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार सकाळपासूनच श्रावणसरींना दमदार सुरुवात झाली.
गंगापूर- ६६.६४
काश्यपी-८९.७४
गौतमी गोदावरी-९२.१८
आळंदी-१००.००
विसर्ग : ३० क्यूसेस
दुसऱ्या दिवशीही शनिवारी (दि.२६) सकाळी १० वाजेपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण दिवसभर पावसाच्या सरी कोसळत होत्या. सकाळपासून कोसळणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवरही तुरळक गर्दी दिसली. हवामान खात्याने पूढील ४८ तासांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि घाटमाथ्यांवर हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवली असून उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांसह नाशिकमध्येही रिमझिम सरी कायम राहण्याची शक्यता आहे. दिवसभर कोसळणाऱ्या सरींमुळे बाजारावरही त्याचा परिणाम जाणवला. श्रावणात व्रतवैकल्याचा महिना असून संततधारेने परिसरात सर्वत्र हिरवेगार, आल्हाददायक वातावरण निर्माण झाले आहे.