नाशिक : आकाशातून संततधार सुरू असताना महापालिकेच्या अवकृपेने नाशिककरांना मात्र सलग तिसऱ्या दिवशीही पाणीबाणीचा सामना करावा लागला. जलशुद्धीकरण केंद्रे तसेच जलवाहिन्यांच्या दुरुस्तीविषयक कामांसाठी शनिवारी आणि काही प्रमाणात रविवारी (दि.22) रोजी शहराचा पाणीपुरवठा बंद होता.
शहराचा दोन दिवस पाणीपुरवठा बंद राहिल्यानंतर जुन्या गंगापूर पंपिंग स्टेशन येथील जलवाहिनी दुरुस्तीचे काम अयशस्वी ठरल्याने गंगापूर धरणावरील पंपिंग स्टेशन बंद करण्याची नामुष्की ओढावली असून, सिडको व इंदिरानगरचा काही भाग वगळता शहराच्या उर्वरित ७० टक्के भागात सोमवारी (दि.23) रोजी देखील पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
विविध जलशुद्धीकरण केंद्रे तसेच बूस्टर पंपिंग स्टेशन येथे दुरुस्ती आनुषंगिक कामांसाठी महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग तसेच स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून गेल्या शनिवारी (दि. २१) शटडाउन घेण्यात आले होते. त्यामुळे शनिवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद होता. बारा बंगला ते नीलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला जोडणारी ९०० मिमी व्यासाची जलवाहिनी जुन्या गंगापूर पंपिंग स्टेशन येथे लिकेज झाल्यानंतर रविवारी पहाटे साडेपाचपर्यंत या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यामुळे रविवारीदेखील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. या जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर चाचणी सुरू असतानाच जलवाहिनी पुन्हा त्याच ठिकाणी फुटली. मोठ्या प्रमाणावर पाणी वाया गेले. शहराचा पाणीपुरवठा कायम ठेवून जलवाहिनी दुरुस्तीचे प्रयत्न पाणीपुरवठा विभागामार्फत केले गेले. परंतु, त्यात यश न आल्याने अखेर गंगापूर पंपिंग स्टेशन बंद करण्याची नामुष्की ओढावली. त्यामुळे सोमवारी मुकणे धरणातून सिडको व इंदिरानगरच्या काही भागांत होणारा पाणीपुरवठा वगळता उर्वरित शहरात पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत जुने पंपिंग स्टेशनमधील जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते.
बारा बंगला ते नीलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी पुन्हा लिकेज झाल्याने गंगापूर धरणातून केला जाणारा पाणीपुरवठा सोमवारी बंद करावा लागला. त्यामुळे शहरातील बहुतांश भागांत पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
रवींद्र धारणकर, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा