

नाशिक : गृहविभागाकडून सातत्याने पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांचा खेळ सुरु असून अपेक्षित बदली होत नसल्याने अधिकार्यांकडून 'सेंटिंग' केली जात आहे. मंगळवारी (दि. ८) नागपूरहून नाशिकला नुकतीच बदली झालेले सावनेरचे उपविभागीय अधिकारी अनिल म्हस्के यांनी नागपूरात थांबण्यास हिरवा कंदील दिला असून नाशिक आयुक्तालयाला त्यांच्याऐवजी अमरावतीच्या उपायुक्त किरिथिका सी. एम. यांची नियुक्ती झाली आहे.
मागील आठवड्यात गृहविभागाने उपायुक्त पदावरील बदल्यांचे आदेश जारी केले होते. त्यात नाशिकचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांची कोल्हापूर येथे नागरी हक्क संरक्षण विभागाच्या अधीक्षकपदी तर, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांची धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली केली. तर, मुंबईतून योगेश चव्हाण व धुळ्याचे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांची नाशिकला उपायुक्तपदीचे आदेश जारी झाले. आठवडा उलटताच, पुन्हा नवीन आदेश जारी झाले असून त्यात बच्छाव यांची नाशिक नागरी हक्क संरक्षण विभागाच्या अधीक्षकपदी तर, योगेश चव्हाण यांची मुंबईतच राज्य गुप्ता वार्ता विभागाच्या उपायुक्तपदी बदली दर्शविण्यात आली.
मंगळवारी (दि.८) दुपारी गृहविभागाने नवीन फेरबदलाचे आदेश जारी करुन नागपूर ग्रामीणचे उपविभागीय अधिकारी अनिल म्हस्के यांची पदोन्नतीने नाशिकला उपायुक्तपदी बदली केली. या आदेशाला २४ तास होत नाही तोच, बुधवारी (दि. ९) नवीन आदेश जारी झाले. त्यानुसार म्हस्के यांची नागपूर ग्रामीणलाच अपर अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर, अमरावतीच्या उपायुक्त किरिथिका सी.एम. यांची नाशिकला उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे