

नाशिक : शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस ठाण्यांसह विविध पथकांमधील पोलिस कर्मचाऱ्यांच्या बदल्या होत आहेत. यंदा पोलिसांनी केलेल्या विनंती बदल्यांना प्राधान्य देत रिक्त जागांनुसार बदली केली जात असल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळत आहे. काहींनी मलईदार पोस्टसाठी 'विशेष विनंती' केल्याची चर्चा आहे. मात्र या विनंतींना वरिष्ठांनी दुर्लक्षित केल्याचे समजते. त्यामुळे बदल्यांसाठी सेटिंग लावणाऱ्यांना धक्का बसल्याची चर्चा पाेलिस आयुक्तालयात रंगली आहे.
पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार, शहरातील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी बदलून नव्या अधिकाऱ्यांना संधी दिली आहे. तसेच तरुण अधिकाऱ्यांनाही त्यांच्या मागणीनुसार बदली देण्यावर कर्णिक यांनी भर दिला आहे. जेणेकरून आवडीच्या ठिकाणी अधिकारी पूर्ण क्षमतेने चांगले काम करतील. त्यामुळे गुन्ह्यांची उकल आणि गुन्हेगारांची धरपकड करण्यात पोलिस ठाण्यांसह गुन्हे शाखेच्या पथकांना यश येत आहे. हाच निकष कर्मचारी बदल्यांमध्येही लावला जात आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेत कर्मचाऱ्यांकडून विनंती अर्ज मागवले. विनंती अर्जानुसार त्या - त्या ठिकाणी रिक्त जागेच्या उपलब्धतेनुसार कर्मचाऱ्यांना अपेक्षित बदल्या मिळत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण परसले आहे. पोलिस ठाण्यासंह इतर विभागांमध्ये पूर्ण सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांकडून बदल्यांसाठी मागविलेल्या अर्जातील तीन पसंतीक्रमानुसार लवकरच बदल्यांचे आदेश निघणार आहेत, तर काही पथके व विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना नियमित नियुक्तींपूर्वीच एक वर्षासाठी त्याच ठिकाणी स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित पोलिस निर्धास्त झाले आहेत. दरम्यान, आयुक्तांच्या सूचनेनुसार विनंती बदल्यांसह अपेक्षेनुसार काम करू द्या, मात्र कसूर केल्यास हयगय बाळगू नका अशा सुचना प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्याचे समजते.
याआधी तत्कालीन पोलिस आयुक्तांनी विनंती बदल्यांना नकार दिल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. मात्र यंदा विनंती बदल्यांनुसार बदल्या होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, विनंती बदल्यांनुसार नियुक्ती मिळालेल्यांना जुनीच जबाबदारी व टेबल मिळणार की, नवीन जबाबदारी मिळणार याकडे पोलिस दलात सर्वांचे लक्ष लागून आहे.