

सिडको (नाशिक) : अंबड पोलिस ठाण्यात गेल्या अडीच वर्षांत तब्बल आठ वरीष्ठ पोलिस निरीक्षक बदलले आहेत. विशेष म्हणजे त्यापैकी एकाही अधिकाऱ्याने आपला कार्यकाळ दोन वर्षांपर्यंत पूर्ण केलेला नाही.
अनुभवी वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांची नेमणूक झाली असली, तरी आगामी मार्च महिन्यात ते सेवानिवृत्त होणार आहेत. मनपा निवडणूक शांततेत पार पाडणे हीच त्यांच्यावर फक्त जबाबदारी राहणार आहे.
नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीत सर्वात संवेदनशील म्हणून अंबड पोलिस ठाण्याकडे पाहिले जाते. सिडको व अंबड भागांत सतत वाढणारे गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी अंबड पोलिस ठाण्यावर सोपविण्यात आली आहे. मागील अडीच वर्षांत एकही वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांनी किमान दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेला नाही. राकेश हांडे यांची चार महिन्यांतच बदली झाली. त्यांच्या जागी पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी अडीच वर्षांत भगीरथ देशमुख हे सर्वाधिक 15 महिने होते. त्यानंतर नंदन बगाडे (दीड महिना), युवराज पक्ती (दीड महिना), सूरज बिजली (तीन महिने), प्रमोद वाघ (सहा महिने), दिलीप ठाकूर (सहा महिने), सुनील पवार (सात महिने) याप्रमाणे कार्यकाळ राहिलेला आहे.
सतत होणाऱ्या बदल्यांमुळे अंबड पोलिस ठाण्याच्या कारभारात सातत्य राहिलेले नाही. अधिकारी बदलल्यावर त्यांच्या कार्यपद्धतीनुसार पोलिस यंत्रणेच्या कामकाजात बदल होतो. त्यामुळे गुन्हेगारी नियंत्रण, स्थानिक समस्यांवर उपाययोजना आणि गुन्हे तपास यावर परिणाम होत असल्याचे पोलिसांचे मत आहे. अंबडकरांसाठी या भागात दीर्घकालीन आणि अनुभवसंपन्न अधिकारी यांची गरज आहे.
सध्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांच्याकडे अंबड पोलिस ठाण्याचा कारभार सोपविण्यात आला आहे. परंतु कड हे मार्च महिन्यात सेवानिवृत्त होत असल्याने ते दीर्घकाळ नसणार आहेत. कड यांनी नऊ वर्षांपूर्वी अंबड पोलिस ठाणे येथे दोन वर्षांचा कालावधी पूर्ण केला होता. त्यांनी अंबड पोलिस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी मोडीत काढताना गुंंडांच्या टोळ्यांना तुरुंगात पाठविले होते.