

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अंबड पोलिस ठाणे हद्दीत २०१९ मध्ये घडलेल्या बालिकेच्या विनयभंग व लैंगिक अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यात न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत पाच वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा सुनावली आहे.
पोलिस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील हद्दीत दि. २ मे २०१९ रोजी सायंकाळी साडेआठच्या सुमारास साईबाबानगर, महाकाली चौक, सिडको, नाशिक येथे ही धक्कादायक घटना घडली होती.
या गुन्ह्यातील आरोपी किशोर दिनकर सोनवणे (२९, रा. साईबाबानगर, महाकाली चौक, सिडको, नाशिक) याने फिर्यादीची अल्पवयीन मुलगी शेजारच्या मुलांसोबत अंगणात खेळत असताना तिच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत तिला खाली पडलेली उशी गच्चीवर आणण्यास सांगितले.
पीडिता मुलगी आरोपीच्या घराच्या गच्चीवर गेल्यानंतर आरोपीने तिचा विनयभंग केल्याचे तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणाचा तपास तत्कालीन अंबड पोलीस ठाण्याच्या महिला पोलिस उपनिरीक्षक सविता गंवादे यांनी आरोपीविरुद्ध ठोस व सबळ पुरावे गोळा करून मा. जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथे दोषारोपपत्र दाखल केले.
७ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. पांढरे यांनी फिर्यादी, साक्षीदार व पंचांच्या साक्षी तसेच तपासी अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आरोपीस दोषी ठरवले.
सीआरपीसी कलम २३५ (२) अन्वये न्यायालयाने आरोपीस पोक्सो कायदा कलम ८ अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व १,००० रुपये दंड (दंड न भरल्यास ३० दिवस साधा कारावास) तसेच कलम १२ अंतर्गत तीन वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड (दंड न भरल्यास १५ दिवस साधा कारावास) अशी शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता भानुप्रिया पेठकर यांनी प्रभावी युक्तिवाद व पुराव्यांची मुद्देसूद मांडणी केली. तसेच अभियोग कक्षाचे प्रभारी पोलिस उपनिरीक्षक प्रदीप गायकवाड, पैरवी अंमलदार हवालदार आर. बी. आजगे आणि कोर्ट अंमलदार रंजना गायकवाड यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून खटला यशस्वी होण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली.