पणजी : पुढारी वृत्तसेवा
विमान वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीने मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात उंची मर्यादांची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मोप विमानतळाभोवती २० किलोमीटरच्या व्यासाची सुरक्षा वर्तुळात (सेफ्टी रॅडिअस) येणाऱ्या सर्व बांधकामांवर शहर व नगर नियोजन खात्यामार्फत (टीसीपी) कडक नियंत्रण ठेवले जाणार आहे.
तसेच त्यासाठी एएआयची परवानगी बंधनकारक राहणार आहे. विमानतळाजवळील परिसर वेगवेगळ्या उंची क्षेत्रांमध्ये विभागण्यात आला असून, विमान उड्डाण व लैंडिंग मार्गांच्या जवळ असलेल्या भागात उंचीवर कठोर निर्बंध असतील.
या भागात परवानगीशिवाय कोणतेही नवीन बांधकाम, मोबाईल टॉवर्स, विद्युत खांब किंवा अन्य उंच संरचना उभारता येणार नाहीत, असे खात्याच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली. या निर्णयानुसार, नागरिक व बांधकाम व्यावसायिकांना २० किमी परिसरात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) तसेच संबंधित नियोजन प्राधिकरणांची मंजुरी घेणे बंधनकारक राहील.