

नाशिकरोड : प्रफुल्ल पवार
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धात नाशिकरोडच्या २३ वर्षीय तरुण वैमानिक ईशांत अमित हा तब्बल १८० प्रवाशांसह आकाशातच संकटाच्या विळख्यात सापडला... पुढील पाच दिवस त्याच्यासह प्रवाशांच्या कुटुंबीयांच्या हृदयाची धडधड अक्षरशः वाढत राहिली. अनिश्चिततेच्या गर्तेत अडकलेले ते क्षण, मृत्यूच्या सावटाखाली घेतलेले निर्णय आणि शेवटी सुखरूप परतण्याचा दिलासा ही सगळी कहाणी अंगावर शहारे आणणारी ठरली.
ईशांतने २८ फेब्रुवारीला दुबईतील शारजाह्न सौदी अरेबियातील मदिना येथे प्रवासी घेऊन उड्डाण केले. नियोजनानुसार प्रवासी उतरवून तो परतीच्या प्रवासाला निघाला; मात्र त्याच वेळी इराण युद्धाचा भडका उडाला.
आकाशातच असताना हवाई हल्ल्यांचा धोका वाढल्याने संबंधित विमान कंपनीने तातडीने सर्व उड्डाणे थांबवण्याचा निर्णय घेतला आणि त्या क्षणी ईशांतने तातडीने आपले विमान दमाम विमानतळावर सुरक्षित उतरवले, अशा कठीण प्रसंगीही या तरुण पायलटने शांतता आणि धीर राखत प्रवाशांना आधार दिला.
सगळं ठीक होईल, या एका वाक्याने त्याने अनेकांच्या डोळ्यांतील अश्रू थांबवले. तब्बल पाच दिवस ईशांत, सहा क्रू मेंबर्स आणि १८० प्रवासी दमाम येथे अडकून पडले. संपर्कही तुटल्याने कुटुंबीयांची अवस्था 'काळजाचा ठोका चुकणारी' झाली होती.
अनेकांनी देवाला साकडे घालत आपल्या माणसांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना केली. पाच दिवसांनंतर परिस्थितीत थोडीशी सुधारणा होताच केवळ एकाच विमानाला दुबईकडे परतण्याची परवानगी मिळाली आणि पुन्हा एकदा ईशांतने उड्डाण केले. एअरस्पेस अचानक बंद होणे, जीपीएस सेवा ठप्प होणे, सततचा तणाव अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्याने जबाबदारीने विमान हाताळले आणि सुमारे पावणेतीन तासांच्या प्रवासानंतर विमान सुरक्षितपणे दुबईत उतरवले.
ईशांत अमित हा २०२३ पासून दुबईस्थित विमानसेवेत कार्यरत असून, डिसेंबर २०२५ पासून तो नियमित उड्डाणे करत आहे. दुबई, अबुधाबी, शारजा यांसह विविध आंतरराष्ट्रीय मागाँवर त्याला विमान चालविण्याचा अनुभव आहे. युद्धजन्य संकटातही शांतता, संयम आणि धैर्य यांचा संगम साधत त्याने दाखवलेली जिद्द आणि कर्तव्यनिष्ठा ही प्रेरणादायी ठरत आहे.
सहकाऱ्यांचा आधार
संपूर्ण संकटात ट्युनिशियाचे कॅप्टन आयमान यांनी क्रू ला मार्गदर्शन करत धीर दिला. त्यांच्या अनुभवामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला, असे ईशांतने सांगितले.