

नाशिक / पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
पंचवटी परिसरातील पेठ रोड येथे अनैतिक संबंध आणि पैशांच्या वादातून एका ३६ वर्षीय विवाहित महिलेने तिच्या २६ वर्षीय प्रियकराचा गळा आवळून खून केल्याची खळबळजनक घटना नवनाथनगर येथे घडली. पंचवटी पोलिसांनी याप्रकरणी मुख्य संशयित महिलेला तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत. तर मंगला गायकवाड व वैशाली खरात या दोघींची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल पंढरीनाथ दांडगे (२६, रा. चौधरी मळा, हनुमानवाडी, पंचवटी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मोठा भाऊ संदीप पंढरीनाथ दांडगे याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित सोनाली राजेंद्र गायकवाड (३६, रा. साळवे चाळ, नवनाथनगर) हिच्याविरुद्ध पंचवटी ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून तिला अटक करण्यात आली आहे. मृत अमोल हा अविवाहित होता. संशयित सोनाली ही विवाहित आहे. या दोघांत गेल्या काही काळापासून अनैतिक संबंध होते.
अमोलच्या या संबंधांना त्याच्या कुटुंबीयांचा तीव्र विरोध होता. मात्र, प्रेमात आंधळा झालेल्या अमोलने घरच्यांचा विरोध झुगारून देत गेल्या १५ दिवसांपूर्वीच हनुमानवाडीतील आपले घर सोडून पेठ रोडवरील नवनाथनगर येथील साळवे चाळीत सोनालीसोबत भाड्याच्या खोलीत राहण्यास गेला होता. मात्र, ज्या प्रेयसीसाठी त्याने घर सोडले, तिनेच त्याचा काळ बनून गेम केला. दरम्यान, उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील, पोलिस निरीक्षक नितीन आंधळे, सुनील पवार, सुधीर पाटील यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित सोनाली हिची कसून चौकशी सुरू केली आहे.
मृत युवकाच्या परिस्थितीजन्य पुराव्यावरून हा खून केवळ एका महिलेने केला नसून तिने अन्य साथीदारांची मदत घेतली असावी. या गुन्ह्यात तीन संशयित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिस त्या दिशेने सखोल तपास करत आहेत. पोलिस निरीक्षक नितीन आंधळे याबाबत पुढील तपास करत आहेत. मध्यरात्री एक वाजता भांडण सोमवारी (दि. २५) रात्री ९.३० ते मंगळवारी (दि. २६) पहाटे ३ च्या दरम्यान ही घटना घडली. प्राथमिक माहितीनुसार, रात्री १ च्या सुमारास अमोल आणि सोनाली यांच्यात अनैतिक संबंध आणि पैशांच्या देवाणघेवाणीवरून जोरदार वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, संशयित सोनालीने राग अनावर झाल्याने कशाच्या तरी साहाय्याने तीने अमोलचा गळा आवळला.
चक्कर आल्याचा बनाव
निपचित पडलेल्या अमोलला सोनालीने इतरांच्या मदतीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेव्हा तिने डॉक्टरांना चक्कर येऊन पडल्याचे सांगितले. मात्र, अमोलच्या गळ्यावरील व्रण मात्र हा वेगळाच प्रकार असल्याचे दर्शवत होते. शवविच्छेदन अहवालात अमोलचा मृत्यू गळा आवळून झाल्याचे स्पष्ट होताच पंचवटी पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हलवून सोनालीला ताब्यात घेतले.