

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
टीसीएस आयटी कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक शोषण आणि धर्मांतर प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिला आश्रय दिल्याच्या आरोपावरून छत्रपती संभाजीनगर येथील नगरसेवक मतीन पटेल व घरमालक हानिफ खान यांची विशेष तपास पथकाने (एसआयटी) सोमवारी दिवसभर कसून चौकशी केली.
त्यांचा मोबाइल फोनही एसआयटीने ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात आधीच पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य संशयित निदा खान ही घटनेनंतर फरार होती. तिचा मुंब्रा, सोलापूरमार्गे छत्रपती संभाजीनगरपर्यंत प्रवास झाल्याचे तपासात उघड झाले आहे. अखेर एसआयटीच्या पथकाने तिला छत्रपती संभाजीनगरमधील नरेगाव परिसरातून अटक केली होती.
निदा खानने मतीन पटेल याच्याशी संपर्क कसा साधला, त्यासाठी मोबाइल, सोशल मीडिया किंवा अन्य कोणते माध्यम वापरण्यात आले, आदी मुद्द्यांवर तपास पथकाने सखोल प्रश्नांची सरबत्ती केली. तपासादरम्यान पटेल याचा निदा खानच्या मावशीशी मोबाइलवर संपर्क झाल्याचेही निष्पन्न झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सोमवारी सकाळी ११.३०च्या सुमारास मतीन पटेल पोलिस आयुक्त कार्यालयात दाखल झाला. त्यानंतर शहर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी सुरू केली. निदा चार दिवस वास्तव्यास होती, त्या घराचे मालक हनीफ खान हे दुपारी १ च्या सुमारास आयुक्तालयात पोहोचले. त्यानंतर दोघांना समोरासमोर बसवून संयुक्त चौकशी करण्यात आली.
या वेळी पटेल याच्यासोबत त्यांचे वकील अॅड. अभयसिंह भोसले तसेच काही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. निदा खान ज्या घरात राहत होती त्या घराची खरेदी १२ मार्च २०२६ रोजी झाल्याचे तपासात समोर आले आहे. पटेल याने आपला कोणताही थेट संबंध नसल्याचा दावा केला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाने कौटुंबिक समस्येत असलेल्या महिलेसाठी काही दिवस घराची व्यवस्था करण्याची विनंती केली होती. त्यानुसार मी घर उपलब्ध असल्यास मदत करण्यास सांगितले.
ये तो अपना घर लगता है!
निदा खान ज्या घरात वास्तव्यास होती त्या हनीफ खान यांना याबद्दल माहिती नव्हती, त्यांनी सांगितले की, जेव्हा निदा खानला अटक झाली तेव्हा प्रसार माध्यमांवर सदर घराचे व्हिडिओ व्हायरल झाले. त्यावेळी हनीफ खान यांची पत्नी ये तो अपनाही घर लगता है, असे तिने आपल्या पतीला सांगितले.