Nashik Encroachment Drive Sarda Circle | सारडा सर्कल परिसरातील 65 अतिक्रमणे जमीनदोस्त

Nashik Encroachment Drive Sarda Circle | पोलिस बंदोबस्तात पहाटेपासून कारवाई
Nashik Encroachment Drive Sarda Circle
Nashik Encroachment Drive Sarda Circlepudhari photo
Published on
Updated on

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख रस्ते आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी नाशिक महापालिकेने शनिवारी (दि. २०) पहाटे धडक कारवाई करीत जुन्या नाशिकमधील सारडा सर्कल ते चौक मंडई, जहांगीर मशीद परिसर, डिलक्स हॉटेलमागील भागासह विविध ठिकाणांवरील सुमारे ६० ते ७० अनधिकृत दुकाने, टपऱ्या, पत्र्याचे शेड्स आणि इतर अतिक्रमणे हटविली.

Nashik Encroachment Drive Sarda Circle
Sangli Crime : सांगलीत तीन सराईत चोरटे जेरबंद

महापौर हिमगौरी आहेर आडके आणि आयुक्त मनीषा खत्री यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, उपायुक्त (अतिक्रमण) सुवर्णा दखणे यांच्या नेतृत्वाखाली ही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. यासाठी महापालिकेचे सहाही विभाग पोलिस प्रशासन आणि सुरक्षा यंत्रणा सहभागी झाली होती.

कारवाईपूर्वी दोन दिवस परिसरातील व्यापारी आणि नागरिकांना ध्वनीक्षेपकाद्वारे तसेच तोंडी सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानांतील साहित्य मित्रपरिवाराच्या मदतीने पिकअप वाहनांमधून इतरत्र हलविण्यास सुरुवात केली होती. काहींनी स्वखुशीने अतिक्रमणे हटविली, तर काहींनी प्रशासनाकडे मुदतवाढीची मागणी केली होती. काही दुकानदारांनी उपायुक्त सुवर्णा दखणे यांच्याकडे दोन ते तीन तासांचा अवधी मागितला. मात्र मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

सारडा सर्कल परिसरातील कब्रस्तान आरक्षणाची जागा, विकास आराखड्यातील (डी.पी.) रस्ता तसेच मंजूर अभिन्यासातील खुल्या जागांवर उभारण्यात आलेली अतिक्रमणे हटविण्यात आली. डिलक्स हॉटेलमागील बाजूस मनपाच्या मोकळ्या भूखंडावर ठेवण्यात आलेले वाहनांचे भंगार साहित्यही हटविण्यात आले. आजच्या मोहिमेत फॅब्रिकेशन दुकाने, कपाट व कोट बनविणारे व्यवसाय, फूड स्टॉल्स, गॅरेज, मोबाइल रिपेअरिंग व मोबाइल शॉप्स, सर्व्हिस स्टेशन, फुलांची दुकाने तसेच अन्य अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांवर कारवाई करण्यात आली.

आ. फरांदे यांनी मानले आभार नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेचे स्वागत केले. आयुक्तांची भेट घेत त्यांचे आभार मानले. प्रभाग क्रमांक २३ अंतर्गत पखाल रोड परिसरातील अनधिकृत अतिक्रमणांवर मंगळवारी (दि. २३) कारवाई करण्यात येणार असून, यामध्ये अनधिकृत लॉन्स, मटण व चिकन दुकाने तसेच स्क्रॅप दुकाने यांचा समावेश आहे.

रहिवाशांना पावसाळ्यानंतरची मुदत

हॉटेल यात्रिक परिसरातील तसेच काही अन्य ठिकाणांवरील अनधिकृत निवासी बांधकामांबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई टाळली आहे. शत्रुघ्न वाघचौरे, भरत वाघचौरे, कैलास हनुमान गांगुर्डे आणि किसन गांगुर्डे यांच्या घरांसह काही रहिवाशांना सप्टेंबर -ऑक्टोबर २०२६ पर्यंतची मुदत देण्यात आली. त्यानंतर जागा रिकामी न केल्यास अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

होर्डिंग हटविताना निर्माण झाला धोका

साक्षी हॉटेलजवळील इमारतीवर लावण्यात आलेले मोठे जाहिरात होर्डिंग क्रेनच्या साहाय्याने हटविताना ते खाली कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन उपायुक्त सुवर्णा दखणे यांनी तातडीने नागरिकांना सुरक्षित अंतरावर हलविण्याचे आदेश दिले. परिसर रिकामा केल्यानंतर कारवाई पूर्ण करण्यात आली.

Nashik Encroachment Drive Sarda Circle
Nashik Municipal Corporation | जुने नाशिक हादरले! 50 हून अधिक दुकानांवर महापालिकेचा 'जेसीबी'चा हातोडा

गॅस गळतीमुळे धावपळ

लोखंडी संरचना कापण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गॅस कटरच्या सिलिंडरमधून काही काळ गॅस गळतीची घटना घडली. मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी झाल्यामुळे अघटित घडण्याचा धोका होता. मात्र प्रशासनाच्या तत्परतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही.

मोठा फौजफाटा तैनात

मोहिमेसाठी सहा जेसीबी, चार ट्रॅक्टर, क्रेन, गॅस कटरसह अन्य यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला. महापालिकेचे सुमारे १०० ते १५० कर्मचारी, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची गाडी, एनएमसी सुरक्षा पथक आणि मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख तसेच मुंबई नाका, पंचवटी आणि भद्रकाली पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news