

लासलगाव : नाशिक जिल्ह्यात 2017 नंतर प्रथमच दारूबंदीसाठी झालेल्या मतदानाने निफाड तालुक्यातील नांदुर्डी गावाने इतिहास रचला आहे. नांदुर्डी येथे दारूबंदीच्या बाजूने कौल मिळाला. प्रचंड बहुमत असतानाही एकूण मतदानाची टक्केवारी 51 टक्क्यांच्या खाली राहिल्याने आता या निकालाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
नांदुर्डी गावात एकूण 4 हजार 406 मतदार नोंदणीकृत आहे. यापैकी 1 हजार 955 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी 44.37 इतकी नोंदविण्यात आली आहे. या मतदानात दारूबंदीच्या समर्थनार्थ म्हणजेच ‘दारूची बाटली आडवी करावी’ या पर्यायासाठी तब्बल 1 हजार 790 मतदारांनी मतदान केले. तर ‘दारूची बाटली उभी ठेवावी’ या पर्यायासाठी केवळ 81 मतदारांनी मतदान केले आहे. दरम्यान, 83 मते बाद ठरविण्यात आली.
दारूबंदीच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर जनसमर्थन स्पष्ट झाले असले तरी, शासनाच्या नियमांनुसार दारूबंदी लागू होण्यासाठी किमान 51 टक्के मतदान आवश्यक असते. मात्र नांदुर्डीतील मतदानाची टक्केवारी या निकषांपेक्षा कमी राहिल्याने या निकालावर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार आता नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे आहेत.
तब्बल आठ वर्षांनी मतदान
सन 2017 मध्ये मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी तसेच सटाणा तालुक्यातील नवेगाव येथे दारूबंदीसाठी मतदान झाले होते. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी जिल्ह्यात पुन्हा एकदा दारूबंदीबाबत मतदान झाले.