

नाशिक : शहरातील सिडको व अंबड परिसरात झालेल्या दोन अपघातांत एका महिलेसह तरुण ठार झाल्याच्या नोंदी पोलिस ठाण्यात करण्यात आल्या आहेत.अपघाताचा पहिला प्रकार सिडकोत घडला. फिर्यादी विश्वास सदाशिव कुलकर्णी (रा. पन्ना हाइट्स, सह्याद्रीनगर, सिडको) यांची पत्नी मेघा विश्वास कुलकर्णी (56) या 26 डिसेंबरला सायंकाळी सिडकोतील स्वॅन पूल झोनसमोरील सर्व्हिस रोड ओलांडत होत्या. त्यावेळी पाथर्डी फाट्याकडून राणेनगर बोगद्याकडे जाणाऱ्या दुचाकीने (एमएच 41, बीएफ 3625) त्यांना धडक दिली.
दुचाकीस्वार समाधान शंकर गांगुर्डे (रा. शुभम पार्क, उत्तमनगर) त्याच्यासोबतचा मित्र योगेश गुलाब चौधरी (रा. गणेश चौक, सिडको) यांनी धडक दिली. त्यात कुलकर्णी यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांच्यावर सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात समाधान गांगुर्डे व योगेश चौधरी विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अपघाताचा दुसरा प्रकार नाशिकरोड परिसरात घडला. फिर्यादी दौलत खंडू जाधव (रा. नांदूर नाका) यांचा पुतण्या दीपक विजय जाधव (36, रा. वडनेर दुमाला) हा डिफेंडर टर्फसमोरील रस्त्यावर त्याचा लहान मुलगा ओमसोबत होता. त्यावेळी अनोळखी चारचाकी वाहनाने दीपक जाधव यास धडक देत गंभीर जखमी केले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अनोळखी वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक विशाल सपकाळे तपास करत आहेत.