

नाशिक : सतीश डोंगरे
देशातील सर्वात मोठ्या प्रस्तावित वाढवण बंदरला नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) इगतपूरी तालुक्यातील भरवीर ते तवा दरम्यान १०४ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतल्याने, निम्म्यापेक्षा अधिक महाराष्ट्र व्हाया भरवीर वाढवण बंदर गाठणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांना वाढवणसाठी भरवीरचा पर्याय सर्वोत्तम ठरणार असल्याने, उत्तर महाराष्ट्राच्या अर्थकारणाला मोठे बळ मिळणार आहे.
देशात निर्यातीत गुजरातनंतर दुसऱ्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्राने २०२०-२१ ते वर्ष २०२४-२५ या काळात अनुक्रमे ५८.३८, ७३.१२, ७२.४४, ६७.२०, ६५.८६ अब्ज डॉलर एवढ्या किमतीची निर्यात केली आहे. एक हजार २० किमी एवढ्या लांबीचा समुद्रकिनारा लाभलेल्या महाराष्ट्रातून सर्वाधिक निर्यात समुद्रामार्गेच होत असल्याने, वाढवण बंदर निर्यातीसाठी वेगवान, किफायतशीर ठरणार आहे. अशात राज्यातील सर्वच निर्यातक्षम जिल्ह्यांमधील मालवाहतुक समुद्धी महामार्गाने वाढवण गाठता येणार आहे.
भरवीर ते तवा जंक्शन हा १०४ किमी लांबीचा फ्रेट कॉरिडॉर उभारण्यासाठी तब्बल १४८९९.७२ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. तवा जंक्शन ते वरोर, वाढवण अशा ३२ किमी लांबीचा मार्ग भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) बांधण्यात येणार आहे. तर भरवीर ते तवा जंक्शन दरम्यानच्या १०४ किमी लांबीच्या द्रुतगती महामार्गाची बांधणी एमएसआरडीसीकडून केली जाणार आहे.
फ्रेट कॉरिडॉरसाठी एक हजार हेक्टर जागेचे संपादन केले जाणार असून, भूसंपादनासाठी दीड हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तवा ते भरवीर अंतर सुमारे १८३.४८ किमी आहे. मात्र, हा महामार्ग तयार होऊन वाहतूक सेवेत दाखल झाल्यास हे अंतर केवळ १०४ किमीवर येणार आहे. ७८ किमीने प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. सध्या तवा ते भरवीर अंतर पार करण्यासाठी चार ते पाच तास लागतात. पण हा महामार्गाने अंतर अवघ्या दीड तासात पार करता येणार आहे.
समृद्धी महामार्गाने जोडलेल्या नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर आणि ठाणे या दहा जिल्ह्यातील मालवाहतुकीला वाढवण गाठण्यासाठी भरवीरचा पर्याय सर्वोत्तम ठरणार आहे. याशिवाय गोंदीया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड, परभणी, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यातील मालावाहतुकीला देखील व्हाया भरवीर वाढवण गाठणे साेयीचे होणार आहे. याशिवाय पुणे जिल्ह्यातील निर्यातक्षम मालवाहतुकीला सिन्नरमार्गे भरवीर गाठणे सोयीचे होणार आहे.
कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर यासह कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमधून देखील मोठ्या प्रमाणात औद्योगिक तसेच कृषी विषयक वस्तूंची मोठी निर्यात केली जाते. यातील बहुतांश निर्यात ही समुद्रीमार्गे केली जाणार असल्याने, या जिल्ह्यांना वाढवण बंदर वरदान ठरणार आहे. या जिल्ह्यातील मालावाहतुकीला वाढवण गाठण्यासाठी वडोदला-मुंबई द्रुतगती महामार्गाचा पर्याय असणार आहे.
इगतपूरी तालुक्यातील भरवीर येथून केल्या जाणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरचा सर्वाधिक फायदा नाशिक जिल्ह्याला पर्यायाने उत्तर महाराष्ट्राला होणार आहे. निम्म्यापेक्षा अधिक महाराष्ट्र या कॉरिडॉरने वाढवण बंदर गाठणार आहे.
मनीष रावल, अध्यक्ष, एव्हीएशन कमिटी, निमा, नाशिक.
विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातून कृषी विषयक उत्पादने (संत्री, केळी, द्राक्षे, कापूस, भाजीपाला, आंबा, डाळिंब), कापड, औद्योगिक यंत्रसामग्री, अभियांत्रिकी उत्पादने, औषधे, वाहने आणि त्याचे सुटे भाग, बेअरिंग, तेल व गॅससाठी वापरले जाणारे लोखंडी पाइप, एसी जनरेटर्स आदी उत्पादने समुद्रीमार्गे निर्यात केली जातात. भरवीर फ्रेट काॅरिडॉरमुळे राज्याच्या निर्यातीत विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्राचा टक्का वाढणार आहे.