

ठळक मुद्दे
राज्यात स्टार्टअपसाठी उद्योजकता धोरणास राज्य मंत्रिमंडळात मान्यता
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (भरवीर येथे) यांना जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडाॅरलाही मंजुरी
नाशिक-मुंबई अंतर कमी होऊन नाशिकच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला गती मिळणार
Maharashtra Cabinet Decision
नाशिक : इगतपुरी-भरवीर येथून वाढवण बंदरापर्यंत जाणाऱ्या नवीन रस्त्याच्या निर्मितीस राज्य मंत्रिमंडळाने मंगळवारी (दि. ५) मंजुरी दिली. या मार्गामुळे समृद्धी महामार्ग थेट वाढवण बंदराशी जोडला जाणार आहे. परिणामी, नाशिक-मुंबई अंतर कमी होऊन नाशिकच्या औद्योगिक व आर्थिक विकासाला गती मिळणार आहे.
प्रस्तावित रस्ता इगतपुरीजवळच्या भरवीर येथून सुरू होईल आणि थेट वाढवण बंदरापर्यंत जाईल. विशेष म्हणजे सारोटीजवळच्या तावा गावाजवळ हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ४८ ला जोडला जाईल. या नवीन जोडरस्त्यामुळे भरवीर ते वाढवण बंदर हे अंतर पार करण्यासाठी लागणारा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे. सध्याच्या परिस्थितीत वाहतूक कोंडीमुळे हे अंतर पार करण्यासाठी साधारणपणे तीन ते चार तास लागतात. मात्र, या नवीन रस्त्यामुळे हेच अंतर केवळ सव्वा तासामध्ये पार करणे शक्य होणार आहे. यामुळे वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम होईल आणि प्रवाशांचा तसेच मालाच्या वाहतुकीचा वेळ वाचेल. ज्यामुळे आर्थिक विकासाला गती मिळेल, असे सांगण्यात येत आहे.
या मार्गामुळे नाशिककरांची दुहेरी टोलमधून सुटका होणार.
नाशिक, मुंबई अंतर आणखी कमी होणार असून, नव्या रस्त्यामुळे साधारणत: अर्ध्या तासाचा अवधी वाचेल.
नाशिकहून पालघर, वाढवण तसेच भविष्यातील चौथी मुंबई यांना सर्वात जवळचे शहर म्हणून नाशिक असणार.
डहाणू, सिल्वासा, दमण येथील औद्योगिक परिसराची कनेक्टिव्हीटी फास्ट होईल.
निफाड डायपोर्टवरून वाढवणपर्यंत केल्या जाणाऱ्या कृषी आणि औद्योगिक मालाची वाहतूक जलद होईल.
वाढवणपासून इतरत्र निर्यात होणारा माल लक्षात घेता या परिसरात लॉजिस्टीक आणि वेअर हाऊसच्या अनेक संधी निर्माण होतील.
कृषी आणि औद्योगिक मालाची नाशिकहून वाढवणपर्यंत वाहतूक अवघ्या तीन तासांवर येईल.
सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यात वेअर हाऊसिंग कॉम्पलेक्स तयार होऊन, रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील.
गुजरातला पाच रस्त्यांची कनेक्टीव्हिटी
नव्या मार्गामुळे नाशिकहून गुजरात गाठण्यासाठी पाच रस्त्यांची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. पेठ, जव्हार, नाशिक-सुरत एनएच ५३, नाशिक-मालेगाव-शिरपूर-अंकलेश्वर-भरूच महामार्ग आणि इगतपुरी भरवीर-सिल्वासा अशा पाच मार्गाने गुजरात गाठणे शक्य होणार आहे.
नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये ठाणे, मुंबई, पालघरमधील नागरिकांची संख्या मोठी आहे. या नव्या मार्गामुळे मुंबई, ठाणे आणि पालघर नाशिकच्या आणखी जवळ आल्याने, येथील नागरिकांकडून सेंकड होम म्हणून नाशिकला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. नव्या मार्गामुळे नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रात समाधानाचे वातावरण आहे.
भरवीरपासूनच्या नव्या मार्गाचा नाशिकला सर्वाधिक लाभ होईल. नाशिक मुंबईच्या आणखी नजीक जाणार आहे. या मार्गामुळे दुहेरी टोलमधून सुटका होणार असली तरी, त्यास दोन ते तीन वर्षांचा अवधी लागेल. त्यामुळे गोदे ते इगतपुरीपर्यंतचे अंतर अवघे २८ किलोमीटर असल्याने, येथील टोलची रक्कम नाममात्र ठेवायला हवी. तर जे जुन्याच रस्त्याने पुढे जातील, त्यांच्याकडून पडघा टोल येथे अधिकची रक्कम आकारावी.
संजय सोनवणे, उपाध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर